
प्रभादेवीत आता व्यावसायिक संघाच्या कबड्डीला प्रो-कबड्डी स्टार्सचा रंग चढणार आहे. ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळाच्या राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धेच्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या चार दिवसीय चढाई-पकडींच्या संघर्षाला लाखमोलाचे इनाम दिले जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत प्रो-कबड्डीतील स्टार्ससह मुंबईच्या मैदानातीलही तारे उतरणार असल्याने प्रत्येक चढाई आणि प्रत्येक पकड निर्णायक ठरणार आहे.
आदर्श नगरातील वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानात दोन मॅटच्या मैदानांवर हा खेळ रंगणार असून साखळी फेरीतून बाद फेरीकडे वाटचाल करताना चढाईपटूंचा जोरदार हल्ला आणि कोपरा रक्षकांची साखळी पकड, सुपर टॅकल आणि डू-ऑर-डाय रेड्स यामुळे वातावरण अधिक तापणार आहे. युवा पलटण, भारत पेट्रोलियम, मध्य रेल्वे, ठाणे महानगरपालिका, मिडलाईन रायगड यांच्यासारखे 18 तगडे व्यावसायिक संघ मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.
प्रो–स्टार खेळाडूंचा धमाका
ओम ज्ञानदीपच्या स्पर्धेचे खरे आकर्षण एकापेक्षा एक प्रो-कबड्डी स्टार्सच आहेत. प्रो-कबड्डी गाजवणारे पंकज मोहिते, असलम इनामदार, योगेश दहिया, मिलन दहिया, संदीप धुल, अजिंक्य पवार, शुभम शिंदे, अरकम शेख, शंकर गदई, अजित पवार, साहिल राणे, बादल सिंग, विशाल ताटे, हर्ष लाड, राकेश जस्ता, सुशांत साईल आणि अजिंक्य कापरे हे दिग्गज खेळाडू आपल्या चढायांनी बचाव, तर डिफेन्स खेळाडू अँकल होल्ड, थाय होल्ड आणि ब्लॉकने रेडर्सना गारद करतील. एका क्षणात सामना फिरवण्याची ताकद या खेळाडूंमध्ये असल्याने प्रत्येक क्षण थरारक ठरणार आहे. प्रभादेवी-वरळीकरांना या स्पर्धेच्या निमित्ताने पुढील चार दिवस कबड्डीचा अस्सल व्यावसायिक खेळ पाहायला मिळणार, यात तीळमात्र शंका नाही.


























































