संपूर्ण दक्षिण हिंदुस्थानवर ऐतिहासिक अन्याय, तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम.के.स्टॅलिन यांनी केंद्र सरकारच्या प्रस्तावित सीमांकन (Delimitation) दुरुस्ती विधेयकावर जोरदार हल्ला चढवला आहे. या विधेयकाला त्यांनी तमिळनाडू आणि संपूर्ण दक्षिण हिंदुस्थानाविरुद्धचा “मोठा ऐतिहासिक अन्याय” असे संबोधत राज्यभर तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी नागरिकांना उद्या आपापल्या घरांवर आणि सार्वजनिक ठिकाणी काळे झेंडे फडकावून निषेध नोंदवण्याचे आवाहन केले आहे.

स्टॅलिन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर केलेल्या पोस्टमध्ये केंद्रातील भाजप सरकारवर थेट निशाणा साधला. “हिंदुस्थानच्या विकासासाठी झटणाऱ्या तमिळनाडू आणि दक्षिणेकडील राज्यांना शिक्षा दिली जात आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रस्तावित सीमांकन दुरुस्ती विधेयक संसदेत सादर करण्याच्या तयारीत असताना त्यांनी हा निर्णय दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय करणारा असल्याचे स्पष्ट केले.

त्यांच्या मते, लोकसंख्येच्या आधारे होणाऱ्या सीमांकन प्रक्रियेमुळे लोकसंख्या नियंत्रणात यशस्वी ठरलेल्या दक्षिणेकडील राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकासात पुढे असलेल्या राज्यांना राजकीयदृष्ट्या दुय्यम स्थान दिले जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. “हा निर्णय केवळ राजकीय नाही, तर दक्षिणेकडील राज्यांच्या योगदानाचा अपमान आहे,” असेही ते म्हणाले.

स्टॅलिन यांनी पुढे इशारा देताना म्हटले की, विंध्य पर्वतांच्या दक्षिणेकडील प्रत्येक नागरिकामध्ये या निर्णयाविरोधात संताप उसळला आहे. “दक्षिण हिंदुस्थानात प्रचंड असंतोष आहे आणि भाजप आगीशी खेळत आहे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यांनी केंद्र सरकारला याबाबत पुनर्विचार करण्याचे आवाहन करत, परिस्थिती गंभीर होण्यापूर्वीच विधेयक मागे घ्यावे, असे सुचवले.