माल कमावणारा खरा सूत्रधार कोण? नेस्को ड्रग्जप्रकरणी अंबादास दानवे आक्रमक, बाहेरच्या अधिकाऱ्याची चौकशीसाठी नियुक्तीची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगाव पूर्व येथील नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलेल्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरून सरकारला लक्ष्य केले असून, या कॉन्सर्टचे आयोजन आणि तिकीट दरांवरून गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अंबादास दानवे यांनी X वर पोस्ट करत सरकारवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. नेस्को येथील कॉन्सर्टची तिकिटे 3 लाख रुपयांपर्यंत होती. यावर गृहखाते बोलणार आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. या तीन लाख रुपयांमध्ये आयोजकांकडून नेमक्या कोणत्या सुविधा पुरवल्या जात होत्या आणि इतकी मोठी रक्कम वसूल केली जात असताना पोलीस आणि प्रशासन कोणाची पाठराखण करत होते? असा बोचरा सवाल त्यांनी केला आहे.

हे गगनाला भिडलेले तिकीट दर केवळ आयोजकांच्या फायद्यासाठी नसून, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ‘माल’ कमावणारे पडद्यामागचे खरे सूत्रधार नेमके कोण आहेत, याचा शोध घेण्याची गरज असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता, स्थानिक पोलिसांऐवजी बाहेरच्या एखाद्या कडक अधिकाऱ्याची तत्काळ नियुक्ती करून चौकशी करण्यात यावी आणि या जीवघेण्या तिकीट दरांचा संपूर्ण हिशोब जनतेसमोर मांडण्यात यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी  पोस्टद्वारे केली आहे.

दरम्यान या प्रकरणावरून शिवसेनेच्या वतीने बुधवारी वनराई पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करण्यात आले. ड्रग्जप्रकरणी आयोजक आणि प्रशासकीय यंत्रणेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली.

नेस्को ड्रग्जप्रकरणी शिवसेना आक्रमक, वनराई पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन; दोषींवर कठोर कारवाईची मागणी