
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया साजरा करण्यासाठी धुळ्यासह खानदेशात मोठी तयारी झाली आहे. अक्षय्य तृतीया पूजन करताना आमरस आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा असल्याने यंदा बाजारात कोकणासह, गुजरात, आंध्र प्रदेशातील आंबे दाखल झाले आहेत. या आंबे खरेदीतून धुळ्यात लाखोंची उलाढाल होते.
अक्षय्य तृतीयेला नाविन्याचा शुभारंभ केला जातो. पूजा करताना देवता आणि पूर्वजांना आमरस आणि पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखविण्याची खान्देशात प्रथा आहे. धुळे शहरातील फळबाजारात आंबे दाखल झाले आहेत. कोकणातील हापूस, पायरी आंब्यासह गुजरात आणि आंध्र प्रदेशातून आंबे मोठय़ा प्रमाणात आले आहेत. आंब्याचे आकारमान आणि गोडवा लक्षात घेऊन दर ठरविले जातात.
बदाम व लालबाग आंब्याला पसंती
पाचपंदील चौकातील विव्रेते शकील बागवान यांनी सांगितले की, यंदा बाजारपेठेत केसर, बदाम, हापूस, लालबाग अशा विविध जातींचे आंबे दाखल झाले आहेत. हापूस जरी महाग असला तरी चवीला आणि रसाला यंदा बदाम आणि लालबाग आंबा अत्यंत गोड आणि रसाळ आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची पसंती या दोन प्रकारच्या आंब्यांना जास्त मिळत आहे.























































