
अमेरिका, इस्रायल -इराण युद्ध आणि जागतिक परिस्थितीवर केलेल्या वक्तव्यांवरून पोप लिओ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील सुरू असलेल्या वादाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. मला त्यांच्याशी वाद घालण्याची इच्छा नाही, असे स्पष्ट करत पोप लिओ यांनी वादाला पूर्णविराम दिला आहे. आपल्याला ट्रम्प यांच्याशी कोणताही वादविवाद किंवा संघर्ष करायची नको आहे, असे ते म्हणाले. तसेच आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला, असेही त्यांनी सांगितले.
आफ्रिका दौऱ्यादरम्यान शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना पोप लिओ म्हणाले की, प्रसार माध्यमांनी त्यांच्या पूर्वीच्या वक्तव्याचा विपर्यास केला. ते म्हणाले की, काही शक्तिशाली लोकांमुळे जग दुःखी आहे, परंतु हे वक्तव्य विशेषतः ट्रम्प यांना उद्देशून नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. ट्रम्प यांच्याशी संघर्ष करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, असे ते म्हणाले.
पोप यांनी असेही सांगितले की, त्यांचे भाषण आधीच तयार करण्यात आले होते. ट्रम्प यांच्या सध्याच्या वक्तव्यांपूर्वीच ते तयार करण्यात आले होते. त्यामुळे त्याचा थेट संबंध अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी जोडणे चुकीचे आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, असे चित्र रंगवले गेले की जणू मला राष्ट्राध्यक्षांशी वादविवाद करायचा आहे, पण माझा तसा कोणताही हेतू नाही, असे त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून पोप लिओ युद्ध, असमानता आणि जागतिक नेतृत्वावर भाष्य करत आहेत. त्यांनी विशेषतः अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षाबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली आहे. या संदर्भातील त्यांची वक्तव्ये वादग्रस्त ठरली आहेत. त्यावर ट्रम्प यांनीही पोप यांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे हा वाद वाढतच होता.
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोप लिओ यांना गुन्हेगारीच्या बाबतीत कमकुवत आणि परराष्ट्र धोरणात वाईट असल्याचे म्हटले होते. तसेच ट्रम्प यांनी स्वतःची एक एआय-निर्मित प्रतिमा देखील पोस्ट केली, ज्यामध्ये ते येशूच्या रूपात दिसत होते. या पोस्टमुळे त्यांच्यावर टीका झाली आणि नंतर ती काढून टाकण्यात आली.
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी या वादात संयमी भूमिका घेतली. त्यांनी पोप यांच्या भूमिकेचे स्वागत केले आणि म्हणाले की, माध्यमे अनेकदा वादाला अवास्तव स्वरूप देतात, तर वास्तविक परिस्थिती वेगळी आहे. पोप लिओ यांचा आफ्रिका दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. ते चार देशांतील ११ शहरांना भेट देत असून अंदाजे १८,००० किलोमीटरचा प्रवास करत आहेत. या दौऱ्यादरम्यान, त्यांनी युद्ध, गरिबी किंवा प्रमुख जागतिक नेत्यांची धोरणे यांसारख्या मुद्द्यांवर पूर्वीपेक्षा अधिक मोकळेपणाने आपली मते व्यक्त केली आहेत.


























































