
मध्य प्रदेशातील इंदूर शहरात शुक्रवारी सकाळी घडलेल्या आगीच्या एका मोठ्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. शहरातील स्कीम क्रमांक 136 परिसरातील बहुमजली इमारतीच्या तळघरात असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या शोरूममध्ये अचानक आग भडकली. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केल्याने शोरूममधील अनेक ई-रिक्षा आणि इतर इलेक्ट्रिक वाहने जळून खाक झाली. तळघरातून उठणाऱ्या प्रचंड धुरामुळे आणि आगीच्या ज्वाळांमुळे संपूर्ण परिसर धुराच्या विळख्यात सापडला. या इमारतीच्या तसेच लगतच्या इमारतींच्या वरच्या मजल्यांवर राहणाऱ्या नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले.
अग्निशमन जवानांनी विशेष शिड्यांच्या मदतीने इमारतीत अडकलेल्या सहा जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले. धुरामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे दोन तास चाललेल्या अथक प्रयत्नांनंतर जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यासाठी जवळपास 14 हजार लिटर पाण्याचा वापर करण्यात आला. असे वृत्त एबीपी ने दिले आहे.
या आगीत शोरूममधील वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आर्थिक हानीचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. आग लागण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, कोणतीही जीवितहानी न झाल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. वेळीच करण्यात आलेल्या बचाव आणि अग्निशमन कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.




























































