
फिफा वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेचा कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सेनेगल, उझबेकिस्तान आणि सोमालिया या देशांशी संबंधित खेळाडू व अधिकाऱ्यांची विमानतळाच्या धावपट्टीवरच कसून चौकशी करण्यात आली. एवढेच नव्हे तर ड्रग्ज शोधण्यासाठी डॉग स्क्वॉडही बोलावण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे.
या घटनांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, खेळाडू आणि क्रीडा अधिकाऱयांशी गुन्हेगारांप्रमाणे वागणूक का दिली जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सोमालियाचे रेफरी उमर आर्टन यांना वैध व्हिसा असूनही मियामी विमानतळावरून परत पाठवण्यात आल्याने या वादाला अधिकच तोंड फुटले आहे. विश्वचषकात रेफरी म्हणून काम करणारे पहिले सोमालियन अधिकारी ठरणाऱया आर्टन यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने सोमालियाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अतिरिक्त चौकशीनंतर त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याचे अमेरिकन अधिकाऱयांनी सांगितले. सोमालियाच्या क्रीडा मंत्रालयाने या निर्णयाला खेळभावनेच्या विरोधातील पाऊल, असे संबोधले आहे.
‘फिफा’च्या मौनावर प्रश्नचिन्ह
दरम्यान, सोशल मीडियावर अमेरिकेच्या या भूमिकेवर जोरदार टीका होत असून, ‘फिफा’च्या मौनावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ‘गोऱया संघांनाही अशीच वागणूक दिली का?’ असा संतप्त सवाल नेटकऱयांनी केला आहे.
याच वेळी इराणच्या फुटबॉल महासंघाने विश्वचषकासाठी राखीव तिकिटांचा हिस्सा कमी करण्यात आल्याचा आरोप करत ‘फिफा’वर निशाणा साधला आहे. त्यामुळे हजारो इराणी समर्थकांचा हिरमोड झाला आहे. 12 जूनपासून सुरू होणाऱया विश्वचषकात 48 संघ आणि 104 सामने असणार आहेत. मात्र, स्पर्धेच्या प्रारंभापूर्वीच अमेरिकेच्या वागणुकीमुळे क्रीडाविश्वात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
अमेरिकेने हाकलले, सोमालियाने डोक्यावर घेतले!
यंदाच्या फिफा वर्ल्ड कपसाठी निवड झालेले सोमालीयन रेफरी उमर अब्दुलकादिर आर्टन यांना अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर मायदेशात त्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. विमानतळावर जमलेल्या शेकडो नागरिकांनी त्यांना खऱया अर्थाने ‘राष्ट्रीय नायक’ ठरवले.
मियामी विमानतळावर तब्बल 11 तास चौकशी, राजकीय प्रश्नांचा भडीमार आणि अखेरीस तुर्कस्तानला परत पाठवण्याचा निर्णय…अमेरिकेच्या या भूमिकेमुळे जगभरातून संताप व्यक्त होत आहे. वैध व्हिसा आणि राजनैतिक पासपोर्ट असूनही आर्टन यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने अमेरिकेच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
2025 मध्ये ‘सीएएफ रेफरी ऑफ द इयर’ पुरस्कार पटकावणारे आर्टन हे विश्वचषकात पंच म्हणून निवड होणारे पहिले सोमाली नागरिक ठरणार होते. मात्र, अमेरिकेच्या निर्णयाने त्यांचे स्वप्न भंगले. दरम्यान, सोमालियात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. ‘पुढील विश्वचषकात मी नक्की असेन,’ असा निर्धार व्यक्त करत आर्टन यांनी चाहत्यांचे आभार मानले. विमानतळावर घोषणाबाजी, बॅनर आणि जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले.
FIFA World Cup 2026 आजपासून जग गोल फिरणार … जगावर ताबा घेण्यासाठी फुटबॉलच्या महासंग्रामाची चढाई
सोमालिया सरकार, फुटबॉल महासंघ आणि सामान्य नागरिकांनी अमेरिकेच्या निर्णयाचा निषेध केला आहे. दुसरीकडे, ‘फिफा’ने नेहमीप्रमाणे हात झटकत ‘स्थलांतर प्रक्रियेत आमचा संबंध नाही,’ अशी भूमिका घेतली आहे. मात्र, अमेरिकेने संशयाच्या नजरेतून पाहिलेले उमर आर्टन आज सोमालियासाठी अभिमानाचे प्रतीक बनले आहेत. अमेरिकेने त्यांना नाकारले, पण मायदेशाने त्यांना विजेत्याचा मान दिला!
96 वर्षांत फुटबॉल विश्वाचे फक्त आठच राजे; फुटबॉलचे एव्हरेस्ट नवा गिर्यारोहक सर करणार?






























































