
>> नीलय वैद्य, [email protected]
ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक-अभिनेते पं. चंद्रकांत लिमये यांचे नुकतेच निधन झाले. ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकात खाँ साहेबांची भूमिका अजरामर करणाऱ्या या अद्वितीय व्यक्तिमत्वाच्या या काही आठवणी.
गाननिपुण पं. वसंतराव देशपांडे यांचे पट्टशिष्य आणि गायक-अभिनेते पं. चंद्रकांत लिमये यांचं नुकतेच निधन झालं ही बातमी धडकली तेव्हा विश्वास बसेना. कारण गेल्याच आठवडय़ात त्यांचा फोन आला होता. म्हणाले, “मुंबईत फार गरम होतंय रे. म्हणून आसामात फिरायला चाललोय, गुवाहाटीला, तेही सहकुटुंब! आल्यावर भेटू. गायनाचा एखादा फक्कड कार्यक्रम रवींद्रला करू त्यानिमित्ताने.” पण दुर्दैव असं की, चार दिवसांतच त्यांच्या निधनाची बातमी आली. ते तिकडच्या हॉटेल रूममधल्या बाथरूममध्ये कोसळले, ऐन मध्यरात्री. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा प्राण घेतला. त्यांच्या जाण्याने जुन्या आठवणी समोर येऊ लागल्या.
त्यांच्या माहीमच्या घरात अनेक वर्षे अनेक औपचारिक आणि अनौपाचारिक मैफली रंगायच्या. कधी फैयाज असायच्या. कधी राजा काळे, तर कधी आणि कोण. त्यांच्या गप्पांमध्ये पं. वसंतरावांचा विषय निघाला नाही असं कधी घडलं नाही. तसंच ‘कटय़ार’मध्ये बुवा ‘खाँसाहेब’ करायचे तेव्हा मी ‘चांद’ची भूमिका करायचो. बुवांनी जाताना ‘खाँसाहेब’ माझ्याकडे सोपवला, हे आवर्जून सांगायला ते विसरत नसत. त्यात त्यांना दरवेळी आनंद मिळत असे. चंद्रकांतजींनी गुरुकुल पद्धतीने तब्बल 12 वर्षे त्यांच्याकडे गायनाचे धडे घेतले होते. त्या एका तपाट ते पुरते बुवामय झाले होते. अगदी अखेरच्या श्वासापर्यंत! गुरूवर नितांत श्रद्धा व समर्पणभाव असेल तर गुरूची गायकी शिष्याच्या गळ्यात आपोआप उतरते. ते मुद्दाम वसंतरावांसारखे गायचे किंवा बोलायचे असे नाही, ते सहज घडायचं. चंद्रकांतजींचे वडील कवी गणेश लिमये नथूबुवा कथ्थक यांचे शिष्य होते, तर आई विमल लिमये माटेबुवांकडे संवादिनी शिकल्या होत्या. आईकडून लय आणि वडिलांकडून सूर मिळाला, असे चंद्रकांतजी मानत.
शाळेच्या कार्यक्रमात ग्वाल्हेर घराण्याचे डॉ. वसंतराव राजोपाध्ये यांनी चंद्रकांतजींची गायन क्षमता हेरली व त्यांना व्यास संगीत विद्यालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पं. नारायणराव व्यास, पं. गजाननबुवा जोशी, सी. पी. रेळे, बालकराम जाधव, पं. रत्नाकर पै यांच्याकडे त्यांनी विविध घराण्यांची तालीम घेतली.
“नाटय़संगीत व ठुमरीसाठी लागणारा सहजपणा माझ्या गळ्यात होताच, पण वसंतरावांनी त्याला शिस्त लावली. आवाजाची फेक, लगाव, रागात शिरण्याची व बाहेर पडण्याची कला, सरगम कशी गायची हे सगळं बुवांनी दिलं,” असं चंद्रकांतजींनी अनेक मुलाखतींत नमूद केलं होतं. बुवांची गायकी अंगात मुरावी म्हणून त्यांनी काही वर्षे स्वतच्या मैफली चक्क बंद केल्या होत्या. ‘कटय़ार’च्या गोवा दौऱयात अभिनेते शंकर घाणेकर यांनी वसंतरावांना “याला शिकवा, हाच तुमचा खरा शिष्य” असं सुचवलं. तेव्हापासून चंद्रकांतजी यांनी हाती घेतलेला तंबोरा मृत्यूपर्यंत सोडला नाही. बुवांची तंबोऱयाची जोडी आजही त्यांच्या शोकेसमध्ये आहे.
वसंतरावांच्या पश्चात ‘खाँसाहेब’ची भूमिका साकारल्यानंतर रसिकांनी व माध्यमांनी चंद्रकांतजींचे भरभरून कौतुक केलं.
गुरूंप्रति कृतज्ञता म्हणून चंद्रकांतजी यांनी 2000 साली ‘वसंतराव देशपांडे संगीत सभा’ स्थापन केली. ‘जयध्वनी’ व ‘चंद्र मोहिनी’ या रागांची निर्मितीही त्यांनी केली आहे. ‘सूरमणी’, ‘सीनियर फेलोशिप’, ‘महाराष्ट्र वैभव’ असे पुरस्कार मिळाले असले तरी दीर्घ कारकीर्द असूनही राज्य वा केंद्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार अद्याप मिळालेला नाही, याची खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली.
चंद्रकांतजींचे आणखी एक वैशिटय़ म्हणजे त्यांचा कुटुंबवत्सल स्वभाव होता. आता पत्नी प्रज्ञा, मुली प्राची-दीपा, मुलगा अभिनेता निनाद असा त्यांचा परिवार आहे, पण आतापर्यंत त्यांच्या हाताखालून गेलेले असंख्य शिष्य, त्यांची मित्रमंडळी, पालक गण हे सगळेच त्यांच्या कुटुंबाचे सदस्य होते. त्यांच्या जिवाला जीव देणारे किती होते याचा अंदाज त्यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित असलेल्या सर्वांना आला.
ते हयात असताना नेहमी गमतीत म्हणायचे, “माझी लाकडं शिवाजी पार्क स्मशानभूमीतच जळतील.” ती त्यांची इच्छा अपूर्ण राहिली आणि त्यांच्या निधनाने त्यांच्यावर प्रेम करणाऱया असंख्य संगीत रसिकांची त्यांचं लाईव्ह गाणं पुन्हा एकदा ऐकण्याची इच्छाही अपूर्ण राहिली.



























































