वेधक – अद्वितीय शौर्याचा सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< जी. एन. पवार

लान्स नाईक मीनाक्षी सुंदरम ए. यांच्या शौर्याला समस्त भारतवासीयांकडून गौरविले जात आहे. नुकतेच 8 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात त्यांना भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार कीर्तिचक्र प्रदान करून सन्मान करण्यात आला.

19 डिसेंबर 2024 रोजी कश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवादविरोधी ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्यातील शूर जवान लान्स नाईक मीनाक्षी सुंदरम ए. अक्षरश मृत्यूशी हातमिळवणी करून आले. चेहऱ्यावर गोळी झेलूनही न थांबता लढतच राहणारे हे वीर योद्धा म्हणजे लान्स नाईक मीनाक्षी सुंदरम ए. (34 RR, KC). त्यांनी संपूर्ण राष्ट्राला दाखवून दिले की, भारतीय सैनिक कोणत्या मातीचे बनलेले असतात, त्यांची जिगर आणि त्यांची राष्ट्राप्रती कर्तव्यनिष्ठा काय असते ते!

19 डिसेंबर 2024 रोजी दक्षिण कश्मीरमधील कुलगाम येथे एका दहशतवादविरोधी कारवाईत हिरिरीने आघाडीवर असणारे लान्स नाईक मीनाक्षी सुंदरम ए. त्यावेळी आर्टिलरी रेजिमेंटच्या 34 राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. दहशतवाद्यांशी झालेल्या जीवघेण्या चकमकीदरम्यान त्यांच्या चेहऱयावर आणि उजव्या खांद्यावर गोळ्या लागून त्यांना गंभीर जखमा झाल्या. 34 RR मध्ये कार्यरत असलेल्या लान्स नाईक मीनाक्षी सुंदरम ए. यांना या भीषण चकमकीदरम्यान चेहऱ्यावर आणि उजव्या खांद्यावर गोळ्या लागल्या. या जखमा इतक्या भयंकर व भीषण होत्या की, त्यामुळे कोणत्याही सर्वसामान्य माणसाने तिथून माघारच घेतली असती, पण लान्स नाईक मीनाक्षी सुंदरम ए. मागे हटले नाहीत. जबरदस्त रक्तस्राव, प्राणांतिक वेदना आणि साक्षात मृत्यू समोर असतानाही ते जराही डगमगले नाहीत. अविश्वसनीय, अतुलनीय धैर्य आणि शौर्य दाखवत, त्याही स्थितीत एका जहाल दहशतवाद्याचा खात्मा केला आणि आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवत मोहिमेच्या यशात मोलाचे योगदान दिले.

त्यांच्या या अद्वितीय शौर्यासाठी आणि साहसासाठी त्यांना भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार कीर्तिचक्र प्रदान करण्यात आला. नुकताच राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला आणि खऱ्या अर्थाने कीर्तिचक्र पावन झालं.