
नीट पेपर 2026 लीक प्रकरणामुळे 22 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली. देशात सातत्याने समोर येणारी पेपर लीकची प्रकरणे, भरती परीक्षांमधील घोटाळे, वाढती बेरोजगारी आणि तरुणांच्या भविष्याशी संबंधित गंभीर मुद्द्यांवरून काँग्रेसने भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात एका मोठ्या देशव्यापी आंदोलनाचे रणशिंग फुकले आहे. “मोदी सरकार तरुणांना रोजगार देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून निष्पक्ष परीक्षा घेण्यासही असमर्थ ठरले आहे. यामुळे देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
केंद्र सरकारविरोधात होणाऱ्या या आंदोलनाची रणनीती देखील निश्चित करण्यात आली आहे. दिल्लीतील पक्ष मुख्यालयात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पक्षाचे सरचिटणीस आणि विविध राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत गुरूवारी सुमारे तीन तास महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर काँग्रेसने आज 13 जून रोजी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याची अधिकृत घोषणा केली आहे. यासंदर्भात एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात देशातील चार प्रमुख शहरांमध्ये ‘युवा आणि छात्र महासंमेलन’ आयोजित केले जाणार आहे.
राहुल गांधी विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधणार
काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी या आंदोलनाबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी देशभरात विद्यार्थी आणि तरुणांच्या मोठ्या संमेलनांना संबोधित करणार आहेत. या संमेलनांमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, युवा संघटना, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि पेपर लीक व परीक्षा घोटाळ्यांमुळे बाधित झालेले उमेदवार सहभागी होतील. या माध्यमातून देशभरातील तरुणांना एकाच मंचावर आणून त्यांच्या समस्या आणि अनुभव जाणून घेतले जाणार आहेत.
The Indian National Congress announces the first phase of a nationwide campaign against paper leaks, exam irregularities, unemployment, and the systematic betrayal of India’s youth by the Modi government.
Here is the statement by Congress General Secretary (Org.) Shri… pic.twitter.com/d0THgzZZPg
— Congress (@INCIndia) June 13, 2026
‘महासंमेलन’ कधी व कुठे होणार?
17 जून: कोटा (राजस्थान)
10जुलै: अलाहाबाद (उत्तर प्रदेश)
11 जुलै: पाटणा (बिहार)
14जुलै: दिल्ली
कॅम्पसपासून कोचिंग क्लासेसपर्यंत जनसंपर्क मोहीम
हे आंदोलन घराघरांत पोहोचवण्यासाठी काँग्रेसने आपली विद्यार्थी संघटना ‘एनएसयूआय’ (NSUI), युथ काँग्रेस, प्रदेश काँग्रेस कमिट्या (PCC) आणि जिल्हा कमिट्यांना (DCC) विशेष जबाबदारी दिली आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी तरुणांना प्रत्यक्ष आणि डिजिटल आमंत्रणे पाठवली जातील. तसेच महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये विशेष संपर्क अभियान चालवले जाईल. याशिवाय कोचिंग संस्था आणि शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाईल आणि देशभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केली जाईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांना घटनास्थळी पोहोचता येणार नाही त्यांच्यासाठी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण केले जाईल.
काँग्रेसच्या प्रमुख मागण्या काय आहेत?
1. NEET परीक्षेचे विकेंद्रीकरण (Decentralization) करणे.
2. सरकारी परीक्षांचे अर्ज शुल्क (Application Fee) पूर्णपणे रद्द करणे.
3. पेपर लीक करणाऱ्या माफियांवर कठोर कारवाई करणे.
4. परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करणे.
5. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणे.
6. भरती प्रक्रिया वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करणे.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा मुद्दा केवळ रस्त्यावरील आंदोलनापुरता मर्यादित न राहता संसदेतही हा मुद्दा गाजणार आहे. येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेतही या प्रश्नावर आवाज उठवला जाईल. देशातील तरुणांसमोर असलेल्या या संकटावर संसदेत सविस्तर चर्चा व्हावी आणि परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी तसेच तरुणांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी नवीन कायदा करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस करणार आहे.




























































