
महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी अहोरात्र खडा पहारा देणाऱया राज्य राखीव पोलीस बलातील (एसआरपीएफ) जवानांचा स्वयंपाक चुलीवर करण्याची वेळ आली आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा होत नसल्याने नवी मुंबईतल्या बळेगाव कॅम्पमध्ये रणरणत्या उन्हात लाकडाच्या चुलीवर जवानांसाठी जेवण आणि रोट्या बनवाव्या लागत आहेत.
राज्यात एसआरपीएफचे 20 गट आहेत. मुंबईपासून गडचिरोली जिल्ह्यात हे गट तैनात करण्यात आले आहेत. देशाची राजधानी असलेल्या मुंबईत, एसआरपीएफ गट क्रमांक 11चा कॅम्प नवी मुंबईतील बळेगावमध्ये आहे. या जवानांच्या विविध कामांसाठी राज्य सरकारचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी तैनात केले आहेत. राज्यातील एसआरपीएफ जवानांच्या जोडीला हे चतुर्थ श्रेणी कामगार खांद्याला खांदा लावून सेवा देत आहेत.
राज्य राखीव पोलीस बलाच्या 20 गटांमध्ये हजारो जवान आणि त्यांना मदत करणारे सुमारे 100 चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत असतात. हे कर्मचारी जवानांसोबत गडचिरोली ते जम्मू-काश्मीर अशा अतिसंवेदनशील भागात तैनात आहेत. या जवानांचे जेवण तयार करण्याची जबाबदारी या कर्मचाऱयांवर आहे. आचारी म्हणून हे कर्मचारी कार्यरत आहेत.
एसआरपीएफ जवानांना वेळेत जेवण तयार करण्यासाठी हे कर्मचारी स्वतःच्या आरोग्याशी तडजोड करून अहोरात्र काम करतात, त्यांच्यासोबतच अशी सापत्न वागणूक का? नवी मुंबईसारख्या राजधानीच्या ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करावा लागणे ही शोकांतिका आहे.
भाऊसाहेब पठाण, महासंघाचे अध्यक्ष
चुलीचा धूर ठरतोय जीवघेणा
सध्या एसआरपीएफ गट क्रमांक 11 नवी मुंबई येथे गॅसचा पुरवठा सुरळीत नसल्याने कर्मचारी त्रस्त आहेत. कर्मचाऱ्यांना चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी लाकडे गोळा करून आणावी लागत आहेत.
चुलीच्या धुरामुळे श्वसनाचे विकार आणि महिला कर्मचाऱयांना इतर आजारांचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात अधिकाऱयांना वारंवार तक्रारी करूनही काहीही कार्यवाही झालेली नाही. या कठीण परिस्थितीमध्ये काम करताना कर्मचाऱयांचे मानसिक आणि शारीरिक खच्चीकरण होत आहे.
एसआरपीएफ गट क्रमांक 11 मध्ये गॅसचा पुरवठा होत नसल्याने, या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना या अमानवीय परिस्थितीत काम करावे लागत आहे.
अपुरा पगार– जोखीम भत्त्याचा अभाव
या निमित्ताने या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांचे इतर प्रश्नही ऐरणीवर आले आहेत. या कर्मचाऱयांच्या कामाचे स्वरूप अत्यंत कठीण आहे. वर्षातील 360 दिवसांपैकी जवळपास 240 दिवस हे कर्मचारी आपल्या कुटुंबापासून दूर बाहेर बंदोबस्तावर असतात. त्यातच 50 टक्के पदे रिक्त असल्याने एका कर्मचाऱयावर दोन ते तीन जणांचे काम करण्याचा ताण आहे. अतिसंवेदनशील ठिकाणी तैनात असूनही त्यांना स्वसंरक्षणासाठी कोणतेही हत्यार किंवा प्रशिक्षण दिले जात नाही. इतकेच नव्हे तर, त्यांना हक्काचा गणवेशही मिळत नाही, परिणामी त्यांना स्वतःच्या खर्चाने खाकी कपडे विकत घ्यावे लागतात.
हे कर्मचारी मैदानावर, कडक उन्हात आणि प्रतिकूल परिस्थितीत आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांना पाच दिवसांचा आठवडा नाही, सुट्टय़ांचा अभाव आणि पोलीस जवानांप्रमाणे कॅशलेस आरोग्य सुविधाही मिळत नाहीत.
असे ‘राज्य सरकारी कर्मचारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी सांगितले. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी त्वरित लक्ष घालून गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत करावा आणि या कर्मचाऱयांच्या मूलभूत प्रश्नांची दखल घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.




























































