मान्सूनचे ढग अचानक गायब, सॅटेलाईट इमेजने वाढवली चिंता; महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणात आल्यानंतर थांबलेल्या मान्सूनमध्ये प्रगती होण्याची आशा असतानाच सॅटेलाईटने टिपलेल्या छायाचित्रांनी चिंता वाढवली आहे. सॅटेलाईट इमेजमध्ये मान्सून हिंदुस्थानातून पूर्णपणे गायब झाल्यासारखा दिसत आहे. देशाच्या दक्षिण आणि मध्य भागात मोसमी पाऊस पोहोचल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पावसाच्या गतीमध्ये मोठी घसरण झाली आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, 4 जून ते 15 जून दरम्यान देशामध्ये सरासरी 53.7 मिमी पावसाच्या तुलनेत केवळ 19.2 मिमी इतकाच पाऊस झाला आहे, म्हणजेच देशभरात पावसाची 64 टक्के घट नोंदवली गेली आहे. मान्सूनच्या हालचालींबद्दल सॅटेलाईटने टिपलेल्या दृश्यांमध्ये चिंताजनक चित्र दिसत आहे. यामध्ये मध्य, दक्षिण आणि पूर्वेकडील मोठा भाग पिवळ्या आणि लाल रंगात दिसत आहे. हे रंग कमी ते अत्यंत कमी पावसाचे संकेत देतात. 15 जून रोजी ‘इन्सॅट-3डीएस’ या उपग्रहाने टिपलेल्या फोटोंमध्ये ही परिस्थिती अधिकच स्पष्टपणे दिसली आहे. सक्रिय मान्सूनशी संबंधित असलेला ढगांचा मोठा थर दिसण्याऐवजी, बहुतांश द्वीपकल्पीय आणि मध्य हिंदुस्थानात आकाश असामान्यपणे निरभ्र दिसत आहे. ढगांची मुख्य हालचाल हिमालय, ईशान्य आणि इंडो-गंगेच्या खोऱ्यात उत्तरेकडील भागांवर केंद्रित झाली आहे. दुसरीकडे अरबी समुद्रातील मान्सून कमकुवत आणि विखुरलेला दिसत आहे.

वायूप्रवाह बदलला

हवामान विभागाच्या मते, मान्सून कमकुवत होण्याचे कारण समुद्रातील आर्द्रतेची कमतरता नसून, वरच्या वातावरणातील वाऱ्याची असामान्य रचना आहे. उच्च वातावरणातील हा वेगाने वाहणारा हवेचा प्रवाह नेहमीपेक्षा खूपच दक्षिणेकडे सरकला आहे.या असामान्य बदलामुळे ‘ईस्टरली जेट’च्या सक्रिय होण्यात अडथळा येत आहे.

बंगालच्या उपसागरात वेग पकडला

राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह 16 राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून नैऋत्य मान्सूनची वाटचाल मंदावली होती. मात्र आता बंगालच्या उपसागरासह समुद्रातील वातावरणीय परिस्थिती पुन्हा अनुकूल झाल्याने मान्सूनने पुन्हा एकदा वेग पकडला आहे.

आंध्र प्रदेशचा उर्वरित भाग, पश्चिम बंगालचा काही भाग, तसेच तेलंगणा, ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागांत मान्सूनने प्रगती केली असून महाराष्ट्राच्या उर्वरित भागांतही पुढील चार ते पाच दिवसांत त्याची आगेकूच होण्याची शक्यता आहे.

दक्षिण हिंदुस्थानातून पुढे सरकल्यानंतर, मोसमी पाऊस महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या आसपास थांबला आहे. ईशान्येकडील राज्यांमधून पुढे सरकल्यानंतर, तो बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये थांबला आहे.

17 जूनपर्यंत उष्णतेची लाट

महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये 17 जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मराठवाड्यात 17 जूनपर्यंत आणि विदर्भात 16 जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहू शकते. महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशात आणि गोव्यात 17 जूनपर्यंत उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. कोकण आणि गोव्याच्या काही भागांमध्ये 16 जूनपर्यंत रात्रीच्या वेळीही उष्णता कायम राहील.