‘कॉक्रोच’च्या दीपकेंवर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) जयपूर येथे पुकारलेल्या आंदोलनात आज राडा झाला. काही लोकांनी आंदोलनात घुसून सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना मारहाण केली. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. यानंतर दीपकेंच्या समर्थकांनी हल्लेखोरांना चांगलेच बदडून काढले.

केंद्रीय परीक्षांमधील पेपरफुटी आणि बेरोजगारीच्या  मुद्दय़ावर सीजेपीने आंदोलनाची हाक दिली होती. जयपूरमधील शहीद स्मारकाजवळ हे आंदोलन झाले. आंदोलनाला ‘जेन झी’ तरुणांनी तुफान गर्दी केली होती. दीपके हे आंदोलन स्थळावर येताच तरुणांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतले. त्यांच्या भोवती मोठी गर्दी झाली. या गर्दीतूनच एक तरुण पुढे आला आणि दीपके यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर आणखी काही तरुणांनी दीपकेंना मारले.

या घटनेनंतर दीपके यांना एका बाजूला नेण्यात आले. मारहाण करणाऱ्या तरुणांना सीजेपीच्या समर्थकांनी चांगलाच चोप दिला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोघांना ताब्यात घेतले. हे तरुण कोण होते आणि त्यांनी दीपकेंना मारहाण का केली, याची चौकशी सुरू आहे.

कितीही हल्ले करा, मुद्दा सोडणार नाही! 

‘जयपूरमध्ये झालेला आजचा हल्ला हा तरुणांना मुख्य मुद्दय़ापासून दूर नेण्याचा प्रयत्न आहे. पण आम्ही मुद्दा सोडणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागेल. देशातील एक कोटी विद्यार्थ्यांवर जो अन्याय झाला आहे. काही विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागली आहे. त्याचे प्रायश्चित्त प्रधान यांना घ्यावेच लागेल,’ असे दीपके म्हणाले. ‘कितीही हल्ले करा. एक नाही दहा थापडा मारा. पण आम्ही मागणीवर ठाम राहू. शांततेत आंदोलन करत राहू,’ असे दीपके यांनी सांगितले.