कॅलिफोर्नियामध्ये अमेरिकन हवाई दलाचे B-52 बॉम्बर विमान कोसळले, 8 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण कॅलिफोर्नियातील मोहावे वाळवंटातील एडवर्ड्स एअर फोर्स बेसवर सोमवारी भीषण अपघाताची घटना घडली. उड्डाण घेताच अमेरिकन हवाई दलाचे B-52 स्ट्रॅटोफोर्ट्रेस (Stratofortress) बॉम्बर विमान कोसळले. खाली कोसळताच विमानाला आग लागली. यात विमानातील सर्व आठही कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, आठ इंजिन असलेले हे विमान एका नियमित चाचणी मोहिमेवर होते. उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच ते एडवर्ड्स येथील धावपट्टीवर कोसळले, अशी माहिती हवाई दलाचे कर्नल जेम्स हेस यांनी दिली. मृतांमध्ये लष्करी अधिकारी, सरकारी कर्मचारी आणि सरकारी कंत्राटदार यांचा समावेश आहे.

हे उड्डाण रडार आधुनिकीकरण कार्यक्रमाला सहाय्य करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते, असे हेस यांनी पत्रकारांना सांगितले. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत तपास सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले.