
फडणवीस सरकारने अटी-शर्तीवर दिलेली कर्जमाफी नको, शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्त करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने केलेल्या गर्जनेने मराठवाडा दणाणून गेला. ‘कर्जमाफी नको, कर्जमुक्ती द्या’ अशी मागणी करत छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, बीडमध्ये जोरदार ट्रक्टर रॅली काढण्यात आली. हिंगोलीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले. नांदेडात शिवसैनिकांनी कर्जमाफीच्या अध्यादेशाची होळी केली. लातुरात शिवसैनिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. छत्रपती संभाजीनगरात पोलिसांनी बॅरिकेट्स लावून रॅली रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांनी स्वतःच बॅरिकेट्स हटवून पोलिसांची दंडेली मोडून काढली.
फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱयांना कर्जमाफी जाहीर केली. मात्र कर्जमाफी जाहीर करून महिने उलटले, पण अजून शेतकऱयांच्या पदरी लाभ पडला नाही. अतिवृष्टी, गारपिटीची मदत वर्ष उलटून गेले तरी मिळाली नाही. शेतकरी कर्जमाफीची चातकासारखी वाट पाहत असताना फडणवीस सरकार मात्र जुमलेबाजी करण्यातच गुंग आहे. पुंभकर्णी झोपेत असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने संपूर्ण मराठवाडय़ात मंगळवारी ‘बळीराजा गर्जना टॅक्टर रॅली’चे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती संभाजीनगरात पोलिसांची दंडेली
मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते सुभाष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय आयुक्तालयावर टॅक्टर रॅली काढण्यात आली. गुरूगोविंदसिंहपुरा भागात पोलिसांनी परवानगी नसल्याचा कांगावा करत बॅरिकेट्स लावून क्रांतीचौकाकडे येणारा रस्ता बंद केला. पोलिसांनी रस्ता अडवल्याचे पाहून संतापलेल्या अंबादास दानवे यांनी स्वतःच बॅरिकेट्स हटवले. क्रांतीचौक, पैठणगेट, गुलमंडीमार्गे ही रॅली विभागीय आयुक्तालयावर धडकली. यावेळी शिवसैनिकांनी दिलेल्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. प्रभारी विभागीय आयुक्त विनय गौडा यांना शेतकऱयांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
नांदेडला सरकारच्या धोरणाचा निषेध
शिवसैनिकांनी नांदेडात फडणवीस सरकारच्या फसव्या कर्जमाफीचा अध्यादेश जाळून निषेध व्यक्त केला. जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, जिल्हा संघटक नरहरी वाघ, दक्षिणचे महानगरप्रमुख मनोज यादव, तालुकाप्रमुख सुनील पाटील कदम यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
सेनगावला बैलगाडीसह भव्य ट्रक्टर मोर्चा
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे टॅक्टर रॅली काढण्यात आली. बैलगाडय़ा, ट्रक्टर सहभागी झालेला हा मोर्चा घोषणा देत तहसील कार्यालयावर धडकला. जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, गोपू पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
लातुरात जिल्हाधिकाऱयांना निवेदन
लातूर येथे शिवसेनेच्या वतीने शेतकऱयांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भारत बस्तेवाड यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक पप्पू कुलकर्णी, महिला जिल्हा संघटक जयश्री उटगे, उपजिल्हाप्रमुख बी. एन. डोंगरे, उपजिल्हाप्रमुख बजरंग जाधव यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.
बीड, शिरूर कासार येथे मोर्चा
बीड येथे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि शिरूर कासार येथे जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने शेतकऱयांच्या मागण्यांसाठी दणदणीत ट्रक्टर रॅली काढण्यात आली. दोन्ही ठिकाणच्या रॅलीत शेतकरी मोठय़ा प्रमाणावर सहभागी झाले होते. यावेळी शिवसैनिकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.



























































