सामना अग्रलेख – मिंधे पुन्हा बाळंत झाले; सहा गद्दार जन्माला आले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिंधे, फडणवीसांच्या भ्रष्ट हातमिळवणीमुळे महाराष्ट्र 25 वर्षे मागे ढकलला गेला आहे. राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. मिंध्यांचे राजकारण, पैशांचा माज एक दिवस फडणवीस यांनाही अडचणीत आणेल. कारण दिल्लीच्या एका गटाची फडणवीस यांच्या विरोधात मिंध्यांना उघड फूस आहे हे उघड झाले आहे. महाराष्ट्राचे प्रश्न वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री फडणवीस मिंध्यांच्या बाळंतपणावर बोलतात व पेढे वाटतात. मिंधे बाळंत झाले. त्यांना सहा गद्दार झाले. आता त्या गद्दारांचे खरे आई-बाप कोण? एवढे मात्र मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे.

महाराष्ट्राला असंख्य प्रश्न भेडसावत आहेत. त्या प्रश्नांची चिंता सरकारच्या थोबाडावर किंचितही दिसत नाही. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार एकत्र आले. एरवी तर फडणवीस आणि शिंदे-मिंध्यांत विस्तव जात नाहीच, पण प्रसिद्ध झालेले कालचे त्यांचे छायाचित्रही त्यादृष्टीने बोलके आहे. फडणवीस बोलत असताना शिंदे हे दुसऱया दिशेला पाहत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या प्रश्नांवर बोलायला हवे होते, पण ते बोलले शिवसेनेतील गद्दारीवर. ‘गद्दारी’ यशस्वी झाल्याबद्दल फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘गद्दारीचे ऑपरेशन यशस्वी झाले असून रुग्ण सुस्थितीत आहे.’’ थोडक्यात त्यांना म्हणायचे आहे की, मिंधे बाळंत झाले व त्यांनी एकाच वेळी सहा सुदृढ गद्दारांना जन्म दिला. हे बाळंतपण साधे नव्हते. ते यशस्वी होण्यासाठी किमान 500 कोटी रुपये खर्च झाले. आता या बाळाचे खरे बाप कोण? यावर संशोधन सुरू आहे. मिंध्यांनी सहा गद्दारांना जन्म दिल्याबद्दल फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. दिल्लीत अमित शहादेखील पेढे वाटत आहेत. महाराष्ट्रात कधीकाळी स्वाभिमानी छत्रपती शिवरायांचे नाव घेतले की, गद्दारांचे धाबे दणाणत होते. मात्र आता शिवरायांच्या स्वाभिमानी विचारांची रेषा लहान करून गद्दारीची रेषा मोठी करण्याचा आनंद फडणवीस घेत आहेत. गद्दारी हीच महाराष्ट्राची ओळख बनली आहे. महाराष्ट्रासमोर प्रश्नांचा डोंगर उभा असताना फडणवीस

गद्दारांच्या कौतुकात समाधान

मानत आहेत, हे बरे नाही. पाऊस लांबल्यामुळे पाणी टंचाईचे मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे लवकरच ग्रामीण जनतेचे स्थलांतर होईल. शेतकऱ्यांच्या गुराढोरांच्या चारापाण्याचा प्रश्न उभा राहील, पण शिवसेनेचे सहा खासदार पन्नास-शंभर कोटींना फोडल्याने त्याचा लाभ ग्रामीण भागातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळेल असे बहुधा श्री. फडणवीस यांना वाटत असावे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतील पाणीसाठा साडेआठ टक्क्यांवर घसरला आहे. राज्याच्या इतर भागांमधील धरणे, तलाव, पाणवठेदेखील सुकले आहेत. झाडे, पाने करपली आहेत. पाणी कपातीस सुरुवात झाली आहे. लोकांच्या घशाला आताच कोरड पडली आहे, पण सहा गद्दार खासदारांचे ‘फोटोसेशन’ व्हावे व मिंधे यांचे बाळंतपण सुखरूप झाल्याची वार्ता फडकावी यासाठी पैशांचा पाऊस पाडला जात आहे. प्रश्न तर ‘नीट’ पेपरफुटीचादेखील आहेच. ‘नीट’ पेपरफुटीचे केंद्र महाराष्ट्रात आहे व राज्यातून जे लोक या प्रकरणी पकडले गेले ते भाजप परिवारातील आहेत. तरुणांच्या भविष्याशी महाराष्ट्रातील भाजपने खेळ केला आहे. या एका प्रश्नावर विधानसभेचे अधिवेशन विरोधकांनी बंद पाडले पाहिजे. फडणवीस यांना जाब विचारला पाहिजे, असे हे प्रकरण आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी हा कायमचा उपाय नाही, असे फडणवीस यांनी जाहीर केले, पण मग शेतकऱ्यांना सक्षम कसे करणार? शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळायला हवा व

शेतकरी पीक विमा योजनेचा

लाभ योग्य रीतीने मिळावा. मात्र तसे होत नाही. ‘आमदार-खासदार’ हाच सध्या ‘माल’ झाला असून या ‘माला’ला जोरदार हमीभाव मिळत आहे. त्यासाठी सत्ताधारी पक्षांकडे तुफान पैसा आहे, पण शेतकऱ्यांना मात्र या मंडळींनी वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. मग फडणवीस-मिंध्यांचे सरकार काय कामाचे? विदर्भ, मराठवाडा दुष्काळाच्या संकटात आहेत. बेरोजगारी, कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर आहे. लाडक्या बहिणींची फसवणूक थांबलेली नाही. 81 लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद केले आहेत. निवडणुका संपताच राज्यकर्त्यांनी बहिणींना वाऱ्यावर सोडले. लोकशाहीत विरोधी पक्षनेत्याचे स्थान हे महत्त्वाचे आहे. आज महाराष्ट्राच्या दोन्ही विधिमंडळ सभागृहांत विरोधी पक्षनेता नाही. कारण विरोधी पक्षनेता सरकारचे वस्त्रहरण करतो, प्रश्न विचारतो अशी भीती सत्ताधाऱ्यांना आहे. लोकशाहीचे हे अधःपतन आहे. मिंधे, फडणवीसांच्या भ्रष्ट हातमिळवणीमुळे महाराष्ट्र 25 वर्षे मागे ढकलला गेला आहे. राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. मिंध्यांचे राजकारण, पैशांचा माज एक दिवस फडणवीस यांनाही अडचणीत आणेल. कारण दिल्लीच्या एका गटाची फडणवीस यांच्या विरोधात मिंध्यांना उघड फूस आहे हे उघड झाले आहे. महाराष्ट्राचे प्रश्न वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री फडणवीस मिंध्यांच्या बाळंतपणावर बोलतात व पेढे वाटतात. मिंधे बाळंत झाले. त्यांना सहा गद्दार झाले. आता त्या गद्दारांचे खरे आई-बाप कोण? एवढे मात्र मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे.