पळून गेलेल्या लांडग्यांच्या पाठीशी जनता नाही;; मराठी अस्मिता सन्मान सोहळ्यात शिवसेना सचिव विनायक राऊत यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतून आलेल्या बाटग्यांनी पक्षफोडीनंतर खासदार पळवले. सहा गेले तरी बारा करण्याची आमची  ताकद आहे. जे षंढ असतात ते पळून जातात; पण मर्द लढत असतात.पळून गेलेल्या लांडग्यांच्या पाठीशी स्वाभिमानी जनता कधीच जात नाही.त्यामुळे बाटग्या राजकारणाला शह देण्यासह छत्रपती शिवरायांचा भगवा फडकवायचा असेल तर आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव, माजी खासदार विनायक राऊत यांनी केले. दरम्यान, प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरातील कोटय़वधी रुपये हडपले; सोने, हिऱयाच्या विटाही पळविल्या, हे कसले हिंदुत्व. त्यांना प्रभू श्रीरामही माफ करणार नाहीत, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कितीही आमिषे आली तरी आजही मातोश्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनानेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱया शिवसैनिकांसह विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्यातील शिवसैनिकांचा मराठी अस्मिता पुरस्काराने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. शहरप्रमुख विशाल देवकुळे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी उपनेते व संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, राज्य वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील शिंत्रे, नामदेव गिरी, संजय चौगुले, अस्लम सय्यद, जिल्हा महिला संघटिका व कोल्हापूर महापालिकेच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे, मंजित माने आदी उपस्थित होते.

अरुण दुधवडकर म्हणाले, शिवसेना एक अथांग समुद्र आहे. कोण गेले याचा काही फरक पडत नाही. जे गेले ते त्यांच्या स्वार्थासाठी गद्दारी करून गेले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागरिकांनी यांना मतदान केले. आता निवडून आल्यानंतर हे गद्दार पळून गेल्याने त्या मतदारसंघातील मतदारांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे दौरा करीत आहेत. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागावे, असे आवाहन दुधवडकर यांनी केले.

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी टीका करणाऱया विरोधकांचा विरोध न पाहता त्यांच्या विकासकामांच्या फायलीवर सह्या केल्या. पण आज तेच विरोधक पक्ष फोडत आहेत. यांचा आता आपण बंदोबस्त करायला हवा. कोल्हापुरात शिवसेनेचे वैभव पुन्हा प्राप्त करण्याची भेट या जन्मशताब्दीनिमित्त देऊया, असे आवाहन महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उदय दळवी यांनी केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले आणि कोल्हापुरात हुकूमशाही पाहायला मिळाली. चार दिवस जनतेची रोजीरोटी बंद राहिली. अशा हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना ताकदीने लढा देत असल्याचे विजय देवणे यांनी सांगितले. यावेळी रविकिरण इंगवले, शहरप्रमुख विशाल देवकुळे यांचेही भाषण झाले.

यावेळी दैनिक ‘सामना’चे जिल्हा प्रतिनिधी शीतल धनवडे यांच्यासह दिलीप देसाई, दीपक गौड, राजू यादव, राजू सांगावकर, संभाजी भोकरे, रघुनाथ टिपुगडे, संभाजी पाटील, कमल पाटील, शुभांगी साळोखे, अस्लम सय्यद, अमोल बुढ्ढे, पद्माकर कापसे, गजानन तोडकर, सुजित हिरेमठ, बाबूराव पाटील, तानाजी आंग्रे, ऍड. सुषमा कवाळे, विष्णू रेडेकर, बाळासाहेब नलावडे, अनिल दबडे, संजय लाड, अजित मोडेकर यांचा मराठी अस्मिता पुरस्काराने सन्मान करण्यात आला.