अवचितगडाच्या खोल दरीत सापडल्या चारशे किलो वजनाच्या दोन तोफा, ‘रोप रेस्क्यू’ प्रणालीचा अनोखा वापर; शिवशंभो प्रतिष्ठान व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेच्या शिलेदारांची मोहीम यशस्वी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध अवचितगडाच्या खोल दरीतून तब्बल ३५० ते ४०० किलो वजनाच्या दोन तोफा पुन्हा गडावर सुरक्षित आणून त्यांची स्थापना करण्यात आली. ‘रोप रेस्क्यू’ प्रणालीचा अनोखा वापर या मोहिमेसाठी करण्यात आला. शिवशंभो प्रतिष्ठान आणि सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेच्या शिलेदारांनी ही संयुक्त मोहीम यशस्वी केली. त्यामुळे दुर्गम गड-किल्ल्यांचा इतिहास आणि त्यांचा अनमोल ठेवा जतन होणार आहे.

या तोफमोहिमेची सुरुवात १२ ते १५ जून रोजी झाली. गड अभ्यास मोहिमेदरम्यान गडाच्या उतरेकडील बुरुजापासून सुमारे ५५० मीटर खोल दरीत पहिली तोफ आढळली. त्यानंतर आणखी शंभर मीटर खोल अंतरावर दुसरी तोफ सापडली. इतिहासाचा हा महत्त्वाचा ठेवा जपण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून शिवशंभो प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या तोफा किल्ल्यावर आणण्याची मोहीम सुरू केली.

मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ५५० मीटर अंतरावरील तोफ गडावर आणण्यात यश आले. मात्र दुसरी तोफ अत्यंत खोल आणि दुर्गम दरीत असल्याने तिला वर काढणे मोठे आव्हान होते. या दोन्ही तोफांचे वजन सुमारे साडेतीन ते चारशे किलो होते. बचाव पथकाने आधुनिक तांत्रिक ‘रोप रेस्क्यू’ प्रणाली, अचूक अँकरिंग आणि योग्य भारवाटप पद्धतीचा वापर करून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने या तोफा दरीतून बाहेर काढून पुन्हा गडावर स्थापित केल्या.

मोहिमेत सहभागी सदस्यांनी सांगितले की, यापूर्वी त्यांनी खोल दऱ्या किंवा नदीपात्रातून जिवंत व्यक्ती अथवा मृतदेह बाहेर काढण्याचे काम केले होते. मात्र साडेतीन ते चारशे किलो वजनाच्या ऐतिहासिक तोफांची रिकव्हरी करणे हा एक नवा आणि मौल्यवान अनुभव होता. भविष्यात नैसर्गिक आपत्ती, दरड कोसळणे किंवा अन्य दुर्घटनांच्या वेळी या कौशल्याचा मोठा उपयोग होईल.