
किरकोळ वादातून अशी हत्याकांडे घडत आहेत. लोकांचा संयम संपला आहे. किरकोळ घटनांवरून वाद वाढतोय व एकमेकांचे रक्त सांडले जात आहे. भारताच्या राज्यकर्त्यांनी संयमाचा व सहिष्णुतेचा मार्ग सोडला आहे. रोज सकाळी उठून लोकांची माथी भडकवायची, त्यांना धर्माच्या नावावर हिंसेला प्रवृत्त करायचे असेच उद्योग सुरू आहेत. समाजातील संयम, सहिष्णुता, शांती संपवून अराजकाची ठिणगी टाकणाऱ्यांनी ‘षंढ गर्दी’ला जन्म दिला आहे. राष्ट्रावर संकट येते तेव्हा शौर्य गाजविणारा, लढणारा समाज गेल्या बारा वर्षांत नष्ट झाला आहे. देशात सध्या षंढांची गर्दी झाली आहे आणि ही षंढांची गर्दी फक्त निरपराध्यांच्या रक्ताचे पाट वाहताना पाहत बसत आहे!
गेल्या दहा-बारा वर्षांत आपला समाज षंढ झाला आहे. समाजाला षंढ, मूकबधिर करण्याचे काम आजच्या राज्यकर्त्यांनी केले आहे. मुंबईत धावत्या लोकलमध्ये 22 वर्षांच्या तरुण मयंक लोहारची हत्या झाली. हत्या चोरी, दरोड्यासाठी झाली नाही. पावसाचे पाणी डब्यात शिरू नये म्हणून दरवाजा बंद करण्यावरून किरकोळ वाद झाला व त्यातून एका आडदांड तरुणाने मयंकला चाकूने भोसकले. हे काय हत्या करण्याचे कारण झाले? समाज ‘जय श्रीराम’चे नारे देतो. भाजपच्या सांगण्यावरून हिंदुत्व धोक्यात असल्याचे नारे देतो, पण धर्माचा मुख्य गाभा संयम व चिंतन आहे, एवढे मात्र तो विसरतो आणि माणूस माणसाचे रक्त सांडतो. पुण्यात एका तरुणीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा खून केला. त्याआधी पुण्यातच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. सुसंस्कृत म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सध्या हे असे निरपराध्यांच्या रक्ताचे थारोळे साचले आहे आणि समाज थंडपणे त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. मुंबईतील मयंक हत्या प्रकरणातही हेच घडले. एक माथेफिरू मयंकवर सपासप वार करत असताना त्या खचाखच भरलेल्या डब्यातील जनता मुर्दाडासारखी हत्येचे व्हिडीओ चित्रण करत होती किंवा थंडपणे हत्याकांड पाहत होती, मयंक किंचाळत होता, आक्रोश करत होता, तडफडत पडला होता व तो खुनी दारूच्या नशेत तेथेच उभा होता. मयंकवर पहिला घाव झाला तेव्हा प्रवाशांपैकी कोणीतरी धाडस करून त्याला रोखले असते तर त्या 22 वर्षांच्या तरुणाचा जीव वाचला असता. त्या डब्यात गर्दी होती आणि सर्व पुरुषच होते. ते मात्र काही पुरुषांसारखे वागले नाहीत. पाच-दहा जणांना
हल्लेखोराला पकडून
खाली पाडता आले असते, पण शेकडो डोळ्यांसमोर एक खून झाला. खुनी गाडीतून उतरून निघून गेला व प्रवासी फक्त सुस्कारे सोडत राहिले. खुन्याच्या नरडीचा घोट घेण्याची मर्दानगी एकानेही दाखवली नाही. हा षंढपणाचा कळस आहे. समाजात हा षंढपणा गेल्या दहा वर्षांत वाढला. आजूबाजूला घडणाऱ्या अशा घटनांना विरोध करू नका, व्यक्त होऊ नका, अशी शिकवण सध्याच्या समाजाला मिळाली आहे. ‘धर्मांतर’, ‘कॉर्पोरेट जिहाद’, ‘मंदिर-मस्जिद’, ‘हिंदू-मुसलमान’ अशा विषयांवर समाज उसळतो, पण मयंक लोहारवर सपासप वार होत असताना हाच समाज षंढासारखा गप्प बसला. फडणवीस-मिंध्यांच्या राजवटीत सामान्य जनता असुरक्षित आहे. सरकार हे सामान्य जनतेसाठी राहिलेले नाही. राजकारणातील गद्दारांना प्रचंड पोलीस फौजफाट्याचे संरक्षण मिळत आहे. सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांवर राज्याचे गृहखाते झटपट कारवाई करते. एक खासदार खुलेआम माध्यमांसमोर, ‘‘मी पाच खून केले व माझ्याकडे बॉम्ब आहेत,’’ अशी कबुली देतो. महिला अत्याचारांत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सकाळी उठून बातम्या वाचल्यावर सामान्यांना प्रश्न पडतो की, आपण महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये? आमच्या आसपास अतिरेक्यांच्या आणि गुंडांच्या टोळ्या वावरत असताना जगायचे कसे? हे बहुतेक माफिया आज सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी बनले आहेत. त्यामुळे कायदा गुंडांचा संरक्षक बनला आहे. महाराष्ट्राला
पूर्णवेळ गृहमंत्र्यांची गरज
आहे. देवेंद्र फडणवीस हे आजचे गृहमंत्री विरोधकांचे पक्ष फोडण्यात इतके गुंतून पडले आहेत की, सामान्य जनतेचे रक्षण करणे ही आपली मुख्य जबाबदारी आहे हेच ते विसरून गेले आहेत. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अधांतरी लटकत आहे. लोकल ट्रेनमध्ये हत्या होतात, बलात्कार होतात व गृहमंत्र्यांनी खेळ मांडला आहे इतरांच्या पक्षांची हत्या करण्याचा. पाच महिन्यांत धावत्या लोकलमध्ये प्रवाशाची हत्या करण्याची ही दुसरी घटना आहे. जानेवारीत चर्चगेट-बोरिवली लोकलमधून उतरताना प्रा. आलोक सिंह यांची हत्या झाली. आता मयंक लोहार मारला गेला. किरकोळ वादातून अशी हत्याकांडे घडत आहेत. लोकांचा संयम संपला आहे. किरकोळ घटनांवरून वाद वाढतोय व एकमेकांचे रक्त सांडले जात आहे. भारताच्या राज्यकर्त्यांनी संयमाचा व सहिष्णुतेचा मार्ग सोडला आहे. रोज सकाळी उठून लोकांची माथी भडकवायची, त्यांना धर्माच्या नावावर हिंसेला प्रवृत्त करायचे असेच उद्योग सुरू आहेत. मयंक लोहार हिंदू व त्याला मारणारा रोशन सुवर्णाही हिंदू. रोशनच्या जागी एखादा रफीक, रईस, अब्दुल असता तर या प्रकाराला ‘लोकल ट्रेन जिहाद’चे स्वरूप देऊन भाजप, मिंधे वगैरे लोकांनी मुंबईतला हिंदू खतऱ्यात असल्याची बांग देत रस्त्यावर हैदोस घातला असता. समाजातील संयम, सहिष्णुता, शांती संपवून अराजकाची ठिणगी टाकणाऱ्यांनी ‘षंढ गर्दी’ला जन्म दिला आहे. राष्ट्रावर संकट येते तेव्हा शौर्य गाजविणारा, लढणारा समाज गेल्या बारा वर्षांत नष्ट झाला आहे. देशात सध्या षंढांची गर्दी झाली आहे आणि ही षंढांची गर्दी फक्त निरपराध्यांच्या रक्ताचे पाट वाहताना पाहत बसत आहे!































































