सामना अग्रलेख – आत्मचिंतन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांमुळे महाराष्ट्राची शांती व समाधानी वृत्ती पूर्णपणे लोपली आहे. नुसती वखवख सुरू आहे. कोणाला पन्नास कोटींत विकत जायचे आहे. कोणाला उपसभापतीपदाच्या लालसेने देहविक्रीला बसवले आहे. कोणाला जनानखान्यातील सेवेचे बक्षीस म्हणून केंद्रात मंत्रीपद हवे आहे. अशा लाचार व मानसिक दुर्बलांना फोडणे किंवा विकत घेणे सोपे असते. त्यात शौर्य नाही. त्यामुळे या मंडळींचे विजयाचे विकट हास्य हे दुर्योधनाचे आहे. भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना दुर्योधन व त्याची टोळी असेच विकट हास्य करीत होती, पण श्रीकृष्ण प्रकटला व त्याने द्रौपदीला वस्त्र पुरवली. पुढे जे महाभारत घडले त्यात दुर्योधन व त्याच्या टोळीचे विकट हास्य नष्ट झाले. सध्या सुरू असलेले विकट हास्य हा सगळ्यांचाच आत्मचिंतनाचा विषय ठरावा.

जनतेच्या प्रश्नांसाठी लढायचे आहे अशा सबबीखाली राजकारणात येणाऱ्यांनी निराश व्हावे असे वातावरण सध्या आहे. प्रत्येकाला सत्तेच्या वळचणीला जाऊन समाजकार्य करायचे आहे. ही वेळ राजकीय कार्यकर्त्यांवर सध्याच्या मोदीछाप सत्ताधाऱ्यांनी आणली आहे. मोदी पन्नासेक वर्षांपूर्वी सत्तेत असते तर बाबा आमटे, शिवाजीराव पटवर्धन, अभय बंग, पोपटराव पवार, प्रकाश आमटे यांच्या समाजकार्याचा रथ पुढे गेला नसता. भाजपच्या वळचणीला आलात तरच सरकारी योजनांचा लाभ मिळेल, विकास निधी मिळेल असे या सगळ्यांना बजावले गेले असते. मधू दंडवते, बॅ. नाथ पै, मधू लिमये, पिलू मोदी, जॉर्ज फर्नांडिस, कॉ. हिरेन मुखर्जी, महाराष्ट्रात गणपतराव देशमुख, प्रा. एन. डी. पाटील वगैरे नीतिमान विधिमंडळ सदस्यांनाही भाजपच्या वळचणीला येण्यास भाग पाडले गेले असते. भाजप व त्यांचे बिनबुडाचे मित्रपक्ष ज्या प्रकारे पक्षांतरे घडवून विकट हास्य करताना दिसत आहेत तो प्रकार विकृत आणि किळसवाणा आहे. भाजप काळात राजकारणातले समाधान, शांतता लोप पावली आहे. विरोधी पक्षांत वर्षानुवर्षे काम करणारे आमदार-खासदारही त्यांच्या भूमिकेत समाधानी होते. लोकशाहीत विरोधी पक्ष टिकला पाहिजे. विरोधी पक्ष मजबूत असेल तर सत्ताधाऱ्यांना माज चढणार नाही अशा विचारांचे राज्यकर्ते महाराष्ट्रात होते. विरोधी बाकांवरील आमदार-खासदारांच्या मतदारांवर आधीच्या राज्यकर्त्यांनी अन्याय केला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात एक अखंड समाधान पर्व सुरू होते. आता चित्र बदलले आहे. महाराष्ट्रात व देशात आज कोणीच समाधानी नाही. एकनाथ मिंधे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची टिकवायची आहे. दोघेही

असमाधानी

आहेत. मिंधे यांनी विरोधी पक्षांचे आमदार-खासदार फोडून दिल्लीतील महाराष्ट्रद्वेष्ट्यांना खूश करण्याचा विडा उचलला आहे. हे खरे असले तरी राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे काही लोक देहविक्रीस तयार झाल्याने गिऱ्हाईक त्यांच्यापर्यंत पोहोचले. आमदार, खासदार होऊनही काही माणसे समाधानी नाहीत. असमाधानातून असंतोष, असंतोषातून अतिमहत्त्वाकांक्षेचा स्फोट होतो. सत्ता, पद, पैशांसाठी नुसती धावाधाव सुरू आहे. बरे, हे सर्व मिळत गेले तरी यांना समाधान नाही. एक मिळाले की, दुसरे हवेसे वाटते. एक पक्ष सोडतो आणि दुसरा पक्ष पकडतो. राजकारणातील या बेडूकउड्यांना अंत नाही. पुन्हा इकडून तिकडे आणि तिकडून इकडे करूनही यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही. अनेक कार्यकर्ते एखाद्या पक्षात हयात घालवतात. रस्त्यावरची आंदोलने करतात, लाठ्या खातात, तुरुंगात जातात. काही जण गोळ्या खातात. तरीही यापैकी अनेकांच्या नशिबी राजकीय किंवा सत्तेचे पद येत नाही. उलट काहींना कोणत्याही मेहनतीशिवाय आमदारक्या, खासदारक्या, मंत्रीपदाची लॉटरी लागते आणि तरी ते असमाधानीच असतात आणि मग बेइमानी करून या डबक्यातून ‘डराव डराव’ करत दुसऱ्या डबक्यात उडी मारतात. शिवसेनेचे सहा खासदार व काल एक विधान परिषद सदस्य याच ‘असमाधानी’ मनःस्थितीत मिंध्यांच्या पायाशी लीन झाले. सर्व पदे भोगून हे गेले. काय तर म्हणे राजकीय अपरिहार्यता म्हणून जावे लागत आहे. कसली आलीय डोंबलाची अपरिहार्यता! स्वार्थासाठी लोटांगण घातले, आईशी बेइमानी केली असे हे का बोलत नाहीत? सत्ताधाऱ्यांना एक प्रकारे माज आला आहे. नैतिकतेच्या किंवा वैचारिक मतभेदांच्या मुद्द्यावर साथ सोडणे, नवा घरोबा करणे हे नवीन नाही, पण सध्या जी पक्षांतरे झाली त्यात कोणती

नैतिकता आणि वैचारिक मतभिन्नता

आहे हे जरा तुम्हाला मतदान केलेल्या मतदार राजास कळू द्या. शिवसेनेच्या मशालीवर निवडून आलात आणि स्वार्थासाठी मिंध्यांच्या जनानखान्यात पोहोचलात. बरे, त्या जनानखान्यात तरी काही मानसन्मान मिळतोय का, तर तेदेखील नाही. दिल्लीश्वरांचे घरगडी, हरकामे म्हणूनच आणि त्यांचे ‘खोजे’ असल्यासारखेच जगावे लागणार आहे. कोणीतरी उपसभापती पदासाठी त्याच जनानखान्यात गेले. या लोकांनी आतापर्यंत किती जनानखाने बदलले त्याचा हिशेब नाही. जनानखान्यातली सेवा कारणी लावणे हीच काहींची राजकीय अपरिहार्यता बनली आहे. ना राष्ट्राचा विचार, ना महाराष्ट्राचा स्वाभिमान. पेजेला देईल त्याच्या शेजेला जायचे. जनानखानी, बावनखणी राजकारण महाराष्ट्राच्या मातीत बिनधास्त सुरू आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांमुळे महाराष्ट्राची शांती व समाधानी वृत्ती पूर्णपणे लोपली आहे. नुसती वखवख सुरू आहे. कोणाला पन्नास कोटींत विकत जायचे आहे. कोणाला उपसभापतीपदाच्या लालसेने देहविक्रीला बसवले आहे. कोणाला जनानखान्यातील सेवेचे बक्षीस म्हणून केंद्रात मंत्रीपद हवे आहे. अशा लाचार व मानसिक दुर्बलांना फोडणे किंवा विकत घेणे सोपे असते. त्यात शौर्य नाही. त्यामुळे या मंडळींचे विजयाचे विकट हास्य हे दुर्योधनाचे आहे. भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना दुर्योधन व त्याची टोळी असेच विकट हास्य करीत होती, पण श्रीकृष्ण प्रकटला व त्याने द्रौपदीला वस्त्र पुरवली. पुढे जे महाभारत घडले त्यात दुर्योधन व त्याच्या टोळीचे विकट हास्य नष्ट झाले. सध्या सुरू असलेले विकट हास्य हा सगळ्यांचाच आत्मचिंतनाचा विषय ठरावा.