
>> प्रकाश यादव
संपदा सोहळा नावडे मनाला।
करी टकळा पंढरीचा ।।
जावे पंढरीसी आवडे मनासी।
कधी एकादशी आषाढी है। तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी।
त्याची चक्रपाणी वाट पाहे।
या जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे संपदा सोहळा मनाला आवडत नाही, तर केवळ पंढरीची आणि विठुरायाच्या भेटीची आस लागलेल्या वैष्णवांच्या उपस्थितीत श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी (दि. ७) देहूगावातून दुपारी चार वाजून २ मिनिटांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
यंदा इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेतली. पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देऊळवाड्यात मोठी गर्दी होऊ नये म्हणून मोजक्याच मानकरी, सेवेकरी आणि वारकऱ्यांना सोडण्यात आले. विठू माउली, तुकोबांचा अखंड जयघोष, टाळ-मृदंगाच्या गजरात वैष्णवांच्या मांदियाळीने अवघी देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन गेली तर अधून-मधून पावसाच्या हजेरीमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यंदा पालखी सोहळ्याचे ३४१ वे वर्ष आहे.
पालखी सोहळ्याच्या कार्यक्रमांना पहाटेपासूनच सुरुवात झाली. पहाटे साडेचार वाजता काकड आरती झाली. पाचपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, संत तुकाराम महाराज शिळा मंदिर, विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा, पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात अध्यक्ष आणि विश्वस्तांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी (7 जुलै) देहूगावातून दुपारी चार वाजून 2 मिनिटांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. pic.twitter.com/2zzsS9u5nu
— Saamana Online (@SaamanaOnline) July 8, 2026
प्रस्थान सोहळ्यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे यांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली. पादुका आकर्षक फुलांनी सजविलेल्या चांदीच्या पालखीत ठेवण्यात आल्या. चारच्या सुमारास मानाच्या खांदेकऱ्यांसह ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेतली, अन् हरिभक्तांनी एकच गजर केला.
पालखी सभामंडपातून बाहेर पडताच पावसाने जोरदार हजेरी लावली. हरिभजन, फुगड्या, दहीहंडी असे विविध खेळ वारकऱ्यांनी सादर केले. अब्दागिरी, सजावटीची छत्री, गरूडटक्के, अकलूजकर व बाभूळगावकर यांचे मानाचे अश्व अशा थाटात पालखीची देऊळवाड्याला प्रदक्षिणा सुरू झाली. पालखी सोहळा देऊळवाड्याला प्रदक्षिणा मारून मुख्य देऊळवाड्यातून बाहेर पडला. इनामदार वाड्यात पालखी पहिल्या मुक्कामासाठी विसावली. बुधवारी (दि. ८) पालखी पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करणार असून, आकुर्डी येथे दुसरा मुक्काम असणार आहे.
तुकोबांच्या पादुका गंगा म्हसले गावचे म्हसलेकर मंडळी यांच्या हस्ते वाजतगाजत जन्मस्थानापासून देऊळवाड्यात आणण्यात आल्या, यानंतर मंदिरातील अहिल्याबाई होळकर भजनी मंडपात अडीचच्या सुमारास प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी तुकोबांच्या पादुकांची विधिवत महापूजा करण्यात आली.
पूर परिस्थितीमुळे दक्षता
गेल्या दोन दिवसांपासून देहूगाव आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. नदीवरील दोन्ही पूल सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. तसेच नदी घाटाकडे वारकरी, भाविकांनी जाऊ नये, यासाठी बॅरिकेटिंग करण्यात आले होते. मंदिरात केवळ मोजक्याच पासधारकांना आणि मानकरी वारकऱ्यांना प्रवेश देण्यात आला.
पालखीसाठी यंदा नवीन चांदीचा देखणा रथ
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी यंदा चांदीचा नवीन सुंदर रथ तयार करण्यात आला आहे. या रथासाठी सुमारे २६० किलो चांदी आणि सागवान लाकडाचा वापर करण्यात आला आहे. राजस्थानातील सिहोर येथे सुरेश मिश्री यांच्या मार्गदर्शनाखाली रथ साकारण्यात आला आहे. या देखण्या रथाचे दर्शन घेण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
बळीराजाला सुखी ठेवण्यासाठी साकडे
राज्यातील काही भागांत पावसाचा कहर झाला आहे; पण मराठवाडयातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला नाही. राज्यभर सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, बळीराजा सुखी राहू दे, असे साकडे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी पांडुरंगाच्या चरणी घातले.
- मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट अन् विद्युत रोषणाई पावसामुळे अनेक दिंड्या देहूत दाखल झाल्या नाहीत ॥ देहू ग्रामस्थांतर्फे ठिकठिकाणी भाविकांसाठी अन्नदान पोलिसांचा बंदोबस्त, सीसीटीव्हीद्वारे वारीवर नजर
- वारीतील चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी जनजागृतीपर फलक
- इनामदार वाड्यात सकाळी नऊ वाजता तुकोबांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. सकाळी १० ते १२ या वेळेत देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर परंपरेनुसार




























































