नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये मधुचंद्र साजरा केला; मुख्य तिकीट निरीक्षक निलंबित, रेल्वेकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे प्रवासादरम्यान एका जोडप्याने आपल्या फर्स्ट क्लास एसी कूपचे एका खासगी डेकोरेटरकडून सजावट करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असलेल्या या प्रकरणाची दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड रेल्वे विभागाने तात्काळ दखल घेतली असून कर्तव्यात कसुरी केल्याप्रकरणी मुख्य तिकीट निरीक्षकाला तडकाफडकी निलंबित केले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या सविस्तर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 6 जुलै 2026 रोजी गाडी संख्या 11002 नंदीग्राम एक्स्प्रेसमधून एक नवविवाहित जोडपे प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान त्यांनी आपल्या फर्स्ट क्लास एसी कूपची सजावट करण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून एका खासगी डेकोरेटरला बुक केले होते. ही ट्रेन जालना स्थानकावर आली असता त्या खासगी डेकोरेटरने रेल्वे प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता थेट कोचमध्ये प्रवेश केला आणि कूपची अंतर्गत सजावट केली.

रेल्वेच्या नियमांनुसार कोणत्याही चालत्या ट्रेनमध्ये किंवा डब्यांमध्ये खासगी व्यक्तीला अशा प्रकारे अनाधिकृत व्यावसायिक काम करण्याची परवानगी नसते. जालना स्थानकावर डेकोरेटरचा झालेला हा अनाधिकृत प्रवेश रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने मोठी चूक मानली जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांदेखत हा प्रकार घडल्याने रेल्वे प्रशासनाने याला गंभीरतेने घेतले आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित मुख्य तिकीट निरीक्षकाला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी एक सविस्तर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीच्या अहवालानंतर दोषींवर अधिक कडक कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.