
पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या कारवाई करणार नाही अशी हमी केंद्र सरकारने दिली होती. मात्र कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन संपताच विद्यार्थ्यांवर कारवाया सुरू झाल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून सीजेपीच्या प्रवक्त्यांनी पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला, तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टानेही विद्यार्थ्यांवर कोणतीही कठोर कारवाई करू नका. त्यांची वैयक्तिक माहिती सार्वजनिक करू नका. तसेच अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्यांची तात्काळ सुटका करा, असे आदेश केंद्राला दिले आहेत. यावर आता शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.
विद्यार्थ्यांवरील कारवाया थांबल्या पाहिजे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या आम्ही सोडणार नाही, असे म्हणतात. मग याची सुरूवात मोदींच्या मंत्रिमंडळापासून व्हायला पाहिजे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या किती लोकांना शरण दिली? वाशिंग मशीनमध्ये टाकले? सुरुवात तिकडून व्हायला पाहिजे, मुलांकडून का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांवर कारवाई नको, तत्काळ सुटका करा! सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्यांना आदेश
शिक्षक मुलांना शिकवणार कधी?
शिक्षकांना शिक्षणबाह्य कामं दिली जात आहेत. एसआयआरसाठी नवीन भरती करा. खुप शिकलेली मुलं बेरोजगार आहेत. तुम्ही शाळा बंद करून एसआयआरटची कामं शिक्षकांना देत आहात, दारोदारी फिरवताहेत. अनेक शिक्षक, महिला शिक्षिका आजारी आहेत. तुम्ही त्यांना पाच-सहा मजले चढायला लावता. गल्लीबोळात फिरायला लावता. मग शिक्षक मुलांना शिकवणार कधी? असा सवालही संजय राऊत यांनी केला.
हार्वर्ड, केंब्रिजच्या डिग्र्या मुंबईत छापल्या गेल्या
नीटच्या प्रकरणामध्ये पंतप्रधानांचा राजीनामा मागत आहोत, कारण ते सरकारचे प्रमुख आहेत. त्यांनी त्यांच्या सरकारवर नियंत्रण ठेवले पाहिजे. प्रत्येक खात्यात काय चालले हे पाहणे त्यांचे कर्तव्य आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पंतप्रधानांनी घेतलेला. तसेच महाराष्ट्रात बोगस डिग्री स्कॅम टोकाला गेलेले आहे. प्रत्येक 10 व्यक्तीमागे दोन डिग्र्या बोगस आहेत असे कुठेतरी वाचले. एवढ्या डिग्र्या बोगस पद्धतीने छापल्या आणि वाटल्या गेल्या आहेत. काय खटले चालले? किती लोकांना अटक झाली? म्हणजे हार्वर्ड, केंब्रिजच्या डिग्र्या मुंबईत छापल्या गेल्या आहेत, असेही राऊत म्हणाले.
त्या रोगाची लागण खालच्या कार्यकर्त्यांना लागणारच ना
दरम्यान, मुंबई महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी स्कॉर्पियो गाड्या घेतल्या होत्या आणि त्या बदलून आता इनोव्हा घ्यायचा प्रस्ताव आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, देशाचे पंतप्रधान आपल्या ताफ्यामध्ये दहा-पंधरी बीएमडब्ल्यू, मर्सिडीज घेऊन फिरत असतील तर त्या रोगाची लागण खालच्या कार्यकर्त्यांना लागणारच ना. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे ताफे बघा. बीएमडब्ल्यू, मर्सिडीज शिवाय गाड्या नाहीत. त्यामुळे आता महानगरपालिकेतही गाड्या बदलत आहेत. गाड्या घेण्यासाठी सरकारी तिजोरीला हात घातला जात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.





























































