
ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू असून सहावा दिवस महाराष्ट्राचा सुपुत्र दिलीप महादू गावित याने गाजवला. दिलीप महादू गावित याने पुरुषांच्या टी 47 श्रेणीतील 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. तर हिंदुस्थानच्याच मोहम्मद बासिल मोरसिंगानकथने रौप्यपदक पटकावून एकाच स्पर्धेत हिंदुस्थान दोन पदकं मिळवून दिले.
23 वर्षीय दिलीप गावितने सुरुवातीपासूनच शर्यतीवर पूर्ण वर्चस्व राखले. सुरुवातीच्याच टप्प्यात घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत त्याने ही शर्यत 10.71 सेकंद या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील नव्या विक्रमी वेळेत पूर्ण केली. दिलीपपाठोपाठ शर्यत पूर्ण करत हिंदुस्थानी धावपटू मोहम्मद बासिल याने रौप्यपदकावर आपले नाव कोरले. राष्ट्रकुल स्पर्धेच्या विजेत्यांच्या मंचावर पहिल्या दोन्ही स्थानांवर हिंदुस्थानी खेळाडूंनी राष्ट्रध्वज फडकवण्याचा क्षण अभिमानास्पद असाच होता.
दरम्यान, दिलीप गावित या स्पर्धेत मुख्यत्वे 400 मीटर T47 शर्यतीतील प्रमुख पदक दावेदार म्हणून उतरला होता. मात्र, 100 मीटरसारख्या अतिशय वेगवान शर्यतीत सुवर्णपदक आणि नवा राष्ट्रकुल विक्रम नोंदवत त्याने स्वतःमधील अष्टपैलू कौशल्य सिद्ध केले आहे. दरम्यान, गावित आणि बासिल यांच्या दोन पदकांमुळे हिंदुस्थानची पदकसंख्या आता 15 वर पोहोचली आहे. यात 3 सुवर्णपदक, 9 रौप्यपदक आणि 3 कांस्यपदकांचा समावेश आहे.
कोण आहे दिलीप गावित?
दिलीप गावित हा महाराष्ट्रातील एका सामान्य कुटुंबात जन्माला आला. तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील सुगरणा तालुक्यातील तोरणडोंगरी या आदिवासी पाड्यावर राहतो. लहानपणी झाडावरून पडल्याने त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. योग्यवेळी उपचार न मिळाल्याने हाताला गँगरिन झाले आणि त्याचा उजवा हात कोपरापासून खाली कापण्यात आला. मात्र, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्याने व्यंगत्वावर मात करत जागतिक अॅथलेटिक्समध्ये हिंदुस्थानचा डंका वाजवला आहे.
A historic double podium for Bharat! 🥇🥈
Heartiest congratulations to Dilip Mahadu Gavit for winning Gold with a Games Record (10.71s) and Mohammed Basil for clinching Silver (10.83s) in the Men’s Para 100m T47.
Dilip scripting history as the first Indian male para-athlete to… pic.twitter.com/yM7jxhYEwu
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) July 29, 2026
दिलीप गावितची कामगिरी
- हांगझोऊ आशियाई पॅरा स्पर्धा (2022) – 400 मीटर T47 प्रकारात सुवर्णपदक
- पॅरिस पॅरालिम्पिक्स (2024) – 400 मीटर T47 प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश (49.99 सेकंद, आठवे स्थान).
- राष्ट्रकुल स्पर्धा (2026) – 100 मीटर T47 शर्यतीत 10.71 सेकंदांच्या विक्रमी वेळेसह सुवर्णपदक.




























































