राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा – महाराष्ट्राच्या दिलीप गावितची ‘सोनेरी’धाव; हिंदुस्थानला तिसरे सुवर्ण, बासिलला रौप्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडूंनी अॅथलेटिक्समध्ये दुहेरी धमाका करीत पोडियमवर तिरंगा दिमाखात फडकवला. नाशिकच्या आदिवासी पाडय़ातून आलेल्या दिलीप गावितने पुरुषांच्या पॅरा टी-47 गटातील 100 मीटर शर्यतीत अखेरच्या क्षणी बाजी मारत हिंदुस्थानला स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. एवढेच नव्हे तर, केरळच्या मोहम्मद बासिलने रौप्यपदक जिंकले.

दिलीपने 10.71 सेपंदांचा राष्ट्रकुल स्पर्धेतील नवा विक्रम नोंदवत सुवर्णपदक पटकावले, तर पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरलेल्या बासिलने 10.83 सेपंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक आपल्या नावावर केले. इंग्लंडच्या केविन सँटोसला 10.85 सेपंदांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. याआधी शर्मिला धनखडने महिला पॅरा शॉटपुट एफ-57 प्रकारात आणि मीराबाई चानूने 48 किलो वजनी गटात सुवर्णपदके जिंकत हिंदुस्थानचे खाते उघडले होते. आता दिलीपने तिसरे सुवर्ण जिंपून हिंदुस्थानची मोहीम आणखी भक्कम केली.

नीरजसह रोहित, यशवीर फायनलमध्ये

हिंदुस्थानचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने पात्रता फेरीत पाचवे स्थान पटकावत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिमाखात फायनलमध्ये धडक दिली. नीरजने केवळ दोनच प्रयत्न करत 79.61 मीटरची सर्वोत्तम भालाफेक नोंदवली आणि अंतिम 12 खेळाडूंमध्ये स्थान निश्चित केले. त्याच्यासोबत रोहित यादव आणि यशवीर सिंह या हिंदुस्थानी भालाफेकपटूंनीही अंतिम फेरी गाठत हिंदुस्थानची ताकद अधोरेखित केली. पाकिस्तानचा अर्शद नदीमही अंतिम फेरीत पोहोचला, पण हा आव्हानवीर पात्रता फेरीत नीरजच्या मागेच राहिला.

राष्ट्रकुलशी नीरजचे सोनेरी नाते

राष्ट्रकुल स्पर्धेशी नीरजचे सोनेरी नाते आहे. 2018च्या गोल्ड कोस्ट स्पर्धेत 86.47 मीटर भालाफेक करत त्याने सुवर्णपदक जिंकले आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील पुरुष भालाफेकीत सुवर्ण जिंकणारा पहिला हिंदुस्थानी ठरला होता. दुखापतीमुळे 2022च्या बर्मिंगहॅम स्पर्धेला मुकलेला नीरज तब्बल आठ वर्षांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पुनरागमन करत आहे.

दुखापतीनंतर आत्मविश्वासाने मैदानावर

गेल्या वर्षभरात पाठीच्या दुखापतीने नीरजला त्रास दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला आणि 2025 जागतिक अजिंक्यपद स्पर्धा त्याच्यासाठी निराशाजनक ठरली. त्यानंतर त्याने धावण्याची पद्धत, थ्रोचा अँगल आणि तंत्र यावर नव्याने मेहनत घेतली. मानसिकदृष्टय़ाही स्वतःला अधिक मजबूत केले. आता तो दुखापतीच्या भीतीने नव्हे, तर आत्मविश्वासाने मैदानात उतरतो. आता अंतिम फेरीत नीरजसमोर केवळ पदक जिंकण्याचेच नव्हे, तर ‘गोल्डन बॉय’ पुन्हा आपल्या सर्वोत्तम लयीत परतल्याचे जगाला दाखवून देण्याचे मोठे आव्हान आहे.

मुरली श्रीशंकरची रुपेरी यशाची पुनरावृत्ती

हिंदुस्थानच्या मुरली श्रीशंकरनेही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुरुवारी सातव्या दिवशी चमकदार कामगिरी करत 8.09 मीटर लांब उडी मारून रौप्यपदक पटकावले. सलग दोन राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये लांब उडीत रौप्यपदक जिंकणारा तो पहिलाच हिंदुस्थानी खेळाडू ठरला. जमैकाच्या तजाय गेलने 8.15 मीटर उडीसह सुवर्ण, तर स्कॉटलंडच्या स्टीफन मॅपेंझीने 8.08 मीटर उडीसह कांस्यपदक मिळवले. मुरली अवघ्या सहा सेंटीमीटरने सुवर्णपदकापासून दूर राहिला.

2024 मध्ये गंभीर दुखापतीमुळे पॅरिस ऑलिम्पिकला मुकलेल्या मुरली श्रीशंकरने हार मानली नाही. दीर्घ पुनर्वसनानंतर त्याने दमदार पुनरागमन करत या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. सलग दुसऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य जिंकून त्याने हिंदुस्थानी अॅथलेटिक्समधील आपले स्थान अधिक मजबूत केले.

बासिलची झपाटय़ाने भरारी

केरळचा मोहम्मद बासिल तब्बल आठ वर्षे सामान्य धावपटू म्हणून स्पर्धा खेळत होता. 2025 मध्ये त्याला पॅरा अॅथलेटिक्सची माहिती मिळाली. त्यानंतर राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) प्रशिक्षणाखाली त्याने स्वतःला घडवले. यंदा बंगळुरू येथे झालेल्या इंडियन ओपन पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण जिंकत त्याने राष्ट्रकुल संघात स्थान मिळवले आणि आता थेट रौप्यपदकावर नाव कोरले.

संघर्षातून घडलेला सुवर्णवीर

23 वर्षीय दिलीप गावितचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. नाशिक जिह्यातील तोरण डोंगरी या आदिवासी गावातील शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. लहानपणी झाडावरून पडल्यामुळे त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. वेळेवर उपचार न मिळाल्याने गँगरीन झाले आणि कोपराखालून हात कापावा लागला. मात्र, या संकटापुढे न झुकता दिलीपने धावपट्टीवर स्वतःचे नवे आयुष्य उभे केले आणि आता राष्ट्रकुल स्पर्धेचे सुवर्णपदक गळय़ात घालून हिंदुस्थानचा अभिमान वाढवला.