खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरण : चुकीचे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरवणे येथील आदिवासी आश्रम शाळेतील नऊ वर्षीय विद्यार्थिनी खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूप्रकरणी पेण पोलिसांनी अखेर वैद्यकीय अधिकारी डॉ. ममता गजबे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. खुशबू तिला कुष्ठरोग नसताना फक्त संशयावरून तिच्यावर कुष्ठरोगाचे उपचार सुरू करण्यात आले. त्यामुळे २२ जानेवारी २०२५ रोजी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी खुशबूचे पालक, ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था, राजीव गांधी पंचायतराज संघटना यांनी गेल्या दीड वर्षापासून संघर्ष केला. अखेर त्यांच्या या संघर्षाला यश आले आहे.

पेण तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या वरवणे येथील आदिवासी आश्रम शाळेमध्ये खुशबू ठाकरे ही शिक्षण घेत होती. महाराष्ट्र शासनाच्या कुष्ठरोगमुक्त कुसुम अभियानांतर्गत त्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी कोणत्याही प्रकारच्या चाचण्या न करता संशयाच्या बळावर तिच्यावर कुष्ठरोगाचे उपचार सुरू करण्यात आले. या उपचारामुळे खुशबूचा मृत्यू झाला. इतकी गंभीर घटना घडूनही पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर, राजीव गांधी पंचायतराज संघटनेच्या महासचिव नंदा म्हात्रे आणि खुशबू ठाकरेचे वडील नामदेव ठाकरे यांनी पेण विभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. त्यानंतर पेण पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला.

आंदोलन तात्पुरते स्थगित

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे, असे सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे महेश पाटील, अजय कालेकर, अशोक मोकल, कैलास काटे, योगेश गोळे, किशोर शिर्के, सतीश पाटील, आदिवासी समाजाचे नेते सुनील वाघमारे, नर्मदा वाघे, वैभवी म्हात्रे, अभिमन्यू म्हात्रे, नरेश कडू आदी उपस्थित होते.