उल्हासनगरच्या नगरसेवकांची जीवाची गुवाहाटी; कुटुंबकबिल्यासह मज्जा, रेडीसन ब्ल्यू हॉटेलात मुक्काम, प्रशिक्षणाच्या नावाखाली जनतेच्या 65 लाखांचा चुराडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उल्हासनगर महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना उल्हासनगरवासीयांच्या पैशांवर नगरसेवकांनी चक्क जीवाची गुवाहाटी केली आहे. प्रशिक्षणाच्या नावाखाली ६५ लाख रुपयांचा चुराडा केला असून सोबत कुटुंबकबिलादेखील होता. रेडीसन ब्ल्यू हॉटेलात या नगरसेवकांनी मुक्काम ठोकला होता. विमानातील या सफरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून उधळपट्टीवर सर्व स्तरांतून टीकेची झोड सुरू आहे. या शिबिरात उल्हासनगरच्या नगरसेवकांना असे कोणते प्रशिक्षण दिले गेले, एवढ्या लांब जाऊन लाखो रुपये खर्च करण्याची काय गरज होती, असे अनेक सवाल नागरिकांनी केले आहेत.

उल्हासनगर शहरात अनेक समस्या असून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी नगरसेवकांना प्रशिक्षण देण्यासाठी थेट आसाममधील गुवाहाटीची जागा निवडण्यात आली. प्रशासकीय कामकाज कसे चाल ते याची माहिती तज्ज्ञांना बोलावून उल्हासनगरात किंवा मुंबईतही देता आली असती. पण अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने २२ ते २६ जुलै या कालावधीत गुवाहाटीत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. नगरसेवकांच्या या गुवाहाटी दौऱ्यासाठी ६५ लाखांच्या खर्चास मंजुरी दिली होती.

पाच दिवस नक्की काय घडले

महानगरपालिकेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात ५ दिवसीय प्रशिक्षण वर्गात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी नगरसेवकांना सभाशास्त्र व कायदेशीर प्रक्रिया, महासभेचे नियम, कायदेशीर चौकट आणि कामकाजाच्या नियमावलीची माहिती दिली. महासभेत प्रभागातील नागरी समस्या व प्रश्न कसे मांडावेत, प्रशासकीय कारभारातील बारकावे समजून घेणे व विषयानुसार अचूक संचिका (फाईल) तयार करण्याचे तंत्र, प्रभागातील विकासकामांची आखणी, उपलब्ध निधीचे नियोजन आणि प्रत्यक्ष अंमल बजावणी आदीचे प्रशिक्षण नगरसेवकांना दिल्याची माहिती देण्यात आली.

गुवाहाटीमधील ज्या रेडीसन ब्ल्यू हॉटेलमध्ये गद्दार आमदारांची बडदास्त ठेवली होती त्याच ठिकाणी उल्हासनगरातील नगरसेवकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

उल्हासनगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी प्रशिक्षण देता आले असते. ६५ लाखांचा चुराडा करून गुवाहाटीला जाण्याची गरज काय, गुवाहाटी लांब असल्याने मी प्रशिक्षणाला गेले नाही.

अंजली साळवे (विरोधी पक्षनेत्या)