
मुरबाड येथील तहसील कार्याल याच्या परिसरात असलेल्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे आवार म्हणजे जणू कोंडवाडा बनला आहे. भटक्या गाई-गुरांनी येथे ठाण मांडले आहे. हम्मा.. हम्मा.. हम्माचा हंबरडा आणि शेण-गोमुत्राच्या दुर्गंधीमुळे येथे समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांचे डोके उठत आहे. पंचायत समितीही अखेरच्या घटका मोजत आहे. तहसील कार्यालयाच्या पिलरला तडे गेले असून लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत. इमारतीच्या डागडुजीवर खर्च केलेले लाखो रुपये वाया गेले असून कार्यालयातील कर्मचारी तसेच विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या जीवाचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येथील कार्यालयाचे उद्घाटन झाले होते. त्यास अंदाजे आठ वर्षे उलटली. ठेकेदाराने दर्जेदार काम न केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागावर अवघ्या दोनच वर्षांत डागडुजी करायची वेळ आली. मात्र दुरुस्तीचा खर्च कागदावरच झालेला दिसतो. दरम्यान दिवसेंदिवस ही इमारत धोकादायक बनली आहे शिवाय आवारात असलेले मुख्य प्रवेशद्धार गेल्या अनेक दिवसांपासून तुटलेले असल्याने विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. स्वच्छतेच्या नावाने बोंब असून इथे येणाऱ्या कर्मचारी व नागरिकांच्या आरोग्याचादेखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
कुठेच साफसफाई नसल्याने आरोग्य धोक्यात
भटक्या जनावरांना सध्या तहसीलदार कार्यालय म्हणजे जणू हक्काचे ठिकाण वाटत आहे. मुरबाडमधील अनेक भटकी जनावरे येथे राजरोसपणे येतात आणि त्यांच्या हम्मा.. हम्मा.. हम्मामुळे सर्वांनाच त्रास होतो. गुरांमुळे ठिकठिकाणी शेणाचे ढिगारे पहावयास मिळत असून कार्यालयात असणाऱ्या स्वच्छतागृहाची व सभोवताली कोणत्याही प्रकारची साफसफाई केली जात नाही. तहसील कार्यालयाचा झालेला कोंडवाडा लवकरात लवकर हटवा आणि इमारतीची डागडुजी करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.




























































