
पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पुलावरून जाणारी ईर्टिगा कार नदीच्या पात्रात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना दारव्हा तालुक्यातील दहेली येथे घडली आहे. या भीषण दुर्घटनेत गाडी चालवणाऱ्या पतीने प्रसंगावधान राखून झाडाचा आधार घेतल्याने बालंबाल बचावला. मात्र, त्यांची पत्नी आणि दोन चिमुकल्या मुली पुराच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी येथील रहिवासी अविनाश खंडारे हे आपल्या कुटुंबीयांसह राळेगाव येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर नातेवाईकांना बोरीअरब येथे सोडून ते पत्नी माधवी खंडारे, मुलगी प्राची आणि साची यांच्यासह दारव्हा मार्गे स्वतःच्या लोणी या गावाकडे परतत होते.
दहेली येथील कुपटी नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वेगाने वाहत होते. पाण्याच्या खोलीचा आणि वेगाचा अंदाज न आल्याने त्यांनी कार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, क्षणातच पाण्याचा प्रचंड प्रवाह कारला ओढून घेऊन गेला. या आणीबाणीच्या प्रसंगी अविनाश खंडारे यांनी कारमधून बाहेर पडत जवळच असलेल्या एका झाडाचा आधार घेतला आणि स्वतःचा जीव वाचवला. मात्र, त्यांची पत्नी माधवी आणि दोन्ही मुलींना कारमधून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. त्या तिघीही कारसह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या.
घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गुरुवार रात्रीपासूनच नदीपात्रात युद्धपातळीवर शोध व बचाव मोहीम राबवली जात आहे. बेपत्ता झालेल्या माधवी खंडारे या लोणी येथील आश्रमशाळेत मानधन तत्त्वावर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. या हृदयद्रावक घटनेमुळे लोणीसह संपूर्ण दारव्हा तालुक्यात तीव्र शोककळा पसरली आहे.
प्रशासनाचा नागरिकांना इशारा
पावसाळ्यात नद्या-नाल्यांना पूर आलेला असताना पुलावरून अथवा रस्त्यावरून वाहने नेण्याचा धोका पत्करू नये. पाण्याचा वेग व खोली धोकादायक असू शकते, त्यामुळे अशा वेळी कोणतीही जोखीम न घेता सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने पुन्हा एकदा करण्यात आले आहे.



























































