
पुणे महापालिकेच्या एका शाळेत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून भाजपच्या नगरसेविका वर्षा साठे यांचे पाय धुतल्याचे फोटो समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेवरून राजकीय वातावरण तापले आहे. शाळा ही शिक्षणाची मंदिरे असून, ती व्यक्तिपूजेचे केंद्र बनविण्याचा प्रयत्न अत्यंत निषेधार्ह असल्याचा घणाघात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहर उपाध्यक्ष अमोल परदेशी यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक, पेन आणि संविधान असावे, कोणत्याही लोकप्रतिनिधीची व्यक्तिपूजा नव्हे. महापालिका शाळेत विद्यार्थ्यांकडून लोकप्रतिनिधीचे पाय धुण्याचा प्रकार घडला असेल, तर तो संविधानिक मूल्यांवर घाला घालणारा असून, शिक्षण व्यवस्थेलाच काळिमा फासणारा आहे. अशा प्रकाराला कोणत्याही परिस्थितीत समर्थन देता येणार नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, समता आणि स्वाभिमानाची शिकवण दिली. मात्र, शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारे व्यक्तिपूजेचे प्रदर्शन घडवून आणले जात असेल, तर तो शिक्षणाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासणारा प्रकार असल्याची टीका परदेशी यांनी केली.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात शाळांमध्ये अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे महापालिका शाळांतील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांचा स्वाभिमान आणि शिक्षणातील संविधानिक मूल्यांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकरणावर प्रशासन आणि संबंधितांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.




























































