बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर; पूरस्थिती गंभीर, अनेक मार्ग बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पेनटाकळी प्रकल्पातील जलसाठा वाढत असून येळगाव धरण पूर्ण भरले आहे. नांदुरा, खामगाव, मलकापूर आणि बुलढाणा तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला असून पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

पेनटाकळी प्रकल्पात सातत्याने पाण्याची आवक सुरू असून धरणातील जलसाठा 56.51 टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून विसर्ग करावा लागू शकतो, असा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी जनावरे, वाहने आणि इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नांदुरा तालुक्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. पिंपळखुटा धांडे गाव जलमय झाले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. रोटी गावाकडे जाणारा पूल पाण्याखाली गेल्याने गावाचा बाहेरील संपर्क तुटला आहे. ईसापूर आणि आंबोळा परिसरातील मार्गही पाण्यामुळे बंद झाले आहेत. खामगाव शहरात अवघ्या काही तासांत 146 मिमी पावसाची नोंद झाली. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे. साईनगर परिसरातील रेल्वे अंडरपासमध्ये 15 ते 20 फूट पाणी साचल्याने नागरिकांनी रेल्वे रुळांवर ठिय्या आंदोलन केले.

बुलढाणा शहरालगतचे येळगाव धरण पूर्ण भरले असून पैनगंगा नदीला पूर आला आहे. साखळी गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने बुलढाणा-चिखली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सागवान ते नांद्रा कोळी दरम्यानचाही पूल पाण्याखाली गेला आहे. मलकापूरमध्ये नळगंगा नदीला मोठा पूर आला असून अनेक वस्त्यांमध्ये पाच फुटांपर्यंत पाणी साचले आहे. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सालीपुरा परिसराचा शहराशी संपर्क तुटला आहे.

दरम्यान, पूरपरिस्थितीत अडकलेल्या एका कुटुंबाची ओम साई फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी नांदुरा येथे सुखरूप सुटका केली. हवामान विभागाने बुलढाणा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीकाठ, पूल आणि जलमय भागांपासून दूर राहण्याचे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.