
बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे. बुलढाणा शहरालगतचे येळगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. बुलढाणा-चिखली महामार्गावरील साखळी गावाजवळील पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद करण्यात आली असून नागरिकांना पुराच्या पाण्यातून वाहने न नेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी-नाले भरून वाहत आहेत. जलस्रोतांची पाणीपातळी झपाट्याने वाढली असून दुपारपर्यंत येळगाव धरण पूर्ण भरल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली. पैनगंगा नदीच्या पुरामुळे साखळी गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने बुलढाणा-चिखली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पूरस्थितीची पाहणी करताना शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी नागरिकांना खबरदारीचे आवाहन केले. पुलावरून वेगाने पाणी वाहत असताना कुणीही जीव धोक्यात घालून वाहन पुरातून काढू नये, असे त्यांनी सांगितले. चिखलीकडे जाणाऱ्या प्रवाशांनी सव, खूपगाव, किनोळा आणि केळवद या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असेही त्यांनी सुचविले.
दरम्यान, सागवान ते नांद्रा कोळी दरम्यानचा पुलही पाण्याखाली गेला असून या मार्गावरील रहदारी पूर्णपणे बंद झाली आहे. पुलावरून जोरदार प्रवाह वाहत असल्याने नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पैनगंगा नदीचा उगम अजिंठा डोंगररांगेतील बुलढाणा पठार परिसरात होतो. पुढे ही नदी सागवान, नांद्रा कोळी आणि येळगाव परिसरातून वाहते. सततच्या पावसामुळे नदीचा प्रवाह मोठ्या वेगाने वाढला असून परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत येळगाव धरण पूर्ण भरल्याने बुलढाणा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार असल्याचे मानले जात आहे. मात्र पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीची पाणीपातळी आणखी वाढून धरणातून पाणी सोडण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नदीकाठ, पूल आणि जलमय भागांपासून दूर राहण्याचे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.



























































