
उत्तराखंडमधील हरिद्वार येथे कावड यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली. ज्वालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जटवाडा पुलाजवळ गंगा कालव्यात चार किशोरवयीन कावाडी बुडाले. हे सर्व कावाडी आपल्या सोबत्यांसोबत गंगेचे पाणी भरण्यासाठी चंदीगडहून हरिद्वारला आले होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, काही कावाडी जटवाडा पुलाजवळ गंगा कालव्यात आंघोळ करत होते. अचानक, एक किशोरवयीन मुलगा खोल पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याचे तीन सोबतीही कालव्यात उतरले, पण त्यांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. काही क्षणांतच चौघांचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच, जल पोलीस आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अनेक तास चाललेल्या बचावकार्यानंतर, चार किशोरवयीन मुलांचे मृतदेह गंगा कालव्यातून बाहेर काढण्यात आले. मृतांचे वय अंदाजे 16 ते 18 वर्षांच्या दरम्यान आहे.



























































