
जुलै महिना संपला असून राज्यातील 3 हजार 29 धरणांमध्ये 63.25 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 70 टक्के इतका होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जलसाठय़ात सात टक्क्यांची घट आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला असून धरणे भरत आहेत. राज्यातील 11 धरणे भरली आहेत.
राज्यातील 11 धरणे 100 टक्के भरली असून यात ठाण्यातील मोडकसागर व तानसा, सोलापुरातील उजनी, पुण्यातील भाटघर व येडगाव, कोल्हापुरातील राधानगरी, गडचिरोलीतील दिना, नाशिकमधील भाम, ओझरखेड, वाघाड आणि तिसगाव या धरणांचा समावेश आहे. यंदा कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्राला पावसाने दिलासा दिला असला तरी मराठवाडय़ातील अनेक धरणे कोरडी आहेत. ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस झाल्यास या भागातील परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.
22 धरणे कोरडीठाक
राज्यातील 22 धरणांमध्ये पाऊस पडला नाही. ही धरणे कोरडीठाक आहेत. यामध्ये सर्वाधिक धरणे ही बीड, धाराशीव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या मराठवाडय़ातील जिह्यातील आहे. यामुळे या ठिकाणी पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

























































