
देवणी तालुक्यातील जव्हळगा साकोळ येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त भरलेल्या यात्रेत एक अत्यंत हृदयद्रावक आणि अंगाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. फिरत्या आकाशपाळण्यात (झुल्यात) बसलेल्या एका १५ वर्षीय शाळकरी मुलीचे केस पाळण्याच्या बेरिंगमध्ये अडकल्याने तिच्या डोक्याची पूर्ण कातडी अन् केस उपटून बाहेर आले. या भीषण अपघातात मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
मानवी गोविंद येलके (वय १५, रा. जव्हळगा साकोळ) असे या दुर्दैवी अपघातातील गंभीर जखमी मुलीचे नाव असून, ती नववीच्या वर्गात शिकत आहे. जव्हळगा साकोळ येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही सप्ताहानिमित्त भव्य यात्रा भरली आहे. या यात्रेत विविध वस्तूंचे व्यापारी, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि लहान-मोठ्या मनोरंजनाचे पाळणे आली आहेत. ३० रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मानवी ही आपल्या मैत्रिणींसोबत यात्रेतील पाळण्यात बसली होती. पाळणा सुरू होऊन त्याने अचानक वेग घेतला असता, वाऱ्यामुळे मानवीचे लांब केस फिरत्या पाळण्याच्या बेरिंगमध्ये अडकले. पाळण्याचा वेग जास्त असल्याने क्षणात तिच्या डोक्याचे केस आणि टोप (कातडी) मुळासकट उपटून बाजूला निघाले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे यात्रेत एकच खळबळ उडाली आणि उपस्थितांचा थरकाप उडाला.
हुशार विद्यार्थिनी जखमी झाल्याने गाव हळहळले…
मानवी ही अत्यंत हुशार मुलगी असून, वर्गात नेहमी तिचा पहिला क्रमांक येतो. तिचे वडील शेळ्या राखून आणि आई-वडील दोघेही मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे जाणाऱ्या या कुटुंबावर अचानक हे मोठे संकट कोसळले आहे. अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या येलके कुटुंबाची सध्या उपचाराच्या खर्चासाठी मोठी धावपळ सुरू आहे. गावातील एका हुशार आणि गुणी मुलीसोबत असा भीषण अपघात घडल्याने संपूर्ण जव्हळगा साकोळ गावावर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पालकांनो, लहान मुलांची काळजी घ्या!
> यात्रेच्या काळात पाळण्यात बसताना सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः लहान मुला-मुलींना पाळण्यात बसवताना त्यांचे केस व्यवस्थित बांधलेले असावेत, कपडे किंवा केस कुठल्याही फिरत्या भागांत अडकणार नाहीत याची दक्षता पालकांनी घेणे आवश्यक आहे. पाळणा चालकांनीही पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवावी, अन्यथा अशा प्रकारच्या गंभीर अपघातांना सामोरे जावे लागू शकते, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

























































