
लखनौ-कानपूर महामार्ग तयार करण्यासाठी तब्बल 4 हजार 200 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या महामार्गाचे उद्घाटन 13 जुलै रोजी करण्यात आले. परंतु, अवघ्या महिन्याभरात या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक एकाच लेनने सुरू आहे. तर उन्नाव येथे सुरू असलेल्या दुरुस्तीमुळे वाहनांना माघारी फिरावे लागत आहे. यावरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे.
या महामार्गाच्या बांधकामासाठी 4,200 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. 4 ऑगस्टपर्यंत या महामार्गावर सहा ठिकाणी रस्ता खचण्याच्या घटना घडल्या. महामार्गाच्या 120 मीटर पट्टय़ातच रस्ता खचण्याच्या घटना घडल्या आहेत. अखिलेश यादव यांनी महामार्गाच्या दुरुस्तीचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून भाजप सरकारवर टीका केली आहे. ‘जो महामार्ग तीन आठवडय़ांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला त्याची दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. हाच भाजपचा विकासाचा अजेंडा आहे. तेथील डांबर लवकर सुकावे यासाठी पंखे लावण्यात आले आहेत, हे सर्व हास्यास्पद आहे,’ असे अखिलेश म्हणाले.
























































