क्या बोलती पब्लिक… देशव्यापी आंदोलन! दीपकेंची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षण व्यवस्थेतील दुरवस्था, वाढती बेरोजगारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या मुद्दय़ांवर आगामी काळात सरकारला घेरण्याची घोषणा ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी केली. यासाठी सप्टेंबर महिन्यापासून ‘क्या बोलती पब्लिक’ ही देशव्यापी मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

नीट पेपर फुटीच्या विरोधातील यशस्वी आंदोलनानंतर ‘कॉक्रोच पार्टी’च्या पुढील वाटचालीसंदर्भात संघटनेच्या कोअर कमिटीची दोन दिवसीय बैठक छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. या बैठकीनंतर अभिजित दीपके पत्रकारांशी संवाद साधताना ‘क्या बोलती पब्लिक’ या मोहिमेची घोषणा केली. या मोहिमेद्वारे संपूर्ण देशात फिरून नागरिक, विद्यार्थी आणि पालकांशी  संवाद साधत व्यापक जनमत तयार करून सरकारविरोधात एक भक्कम ‘दबाव गट’ निर्माण केला जाणार आहे. विद्यार्थी, तरुण आणि सामान्य नागरिकांचे दैनंदिन प्रश्न थेट प्रशासनापर्यंत पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे दीपके यांनी स्पष्ट केले.

पारंपरिक राजकारणापासून दूर

सीजेपी पारंपरिक राजकारणात पडणार नाही, कारण कोणतीही एक व्यक्ती एकटय़ाने सर्व समस्या सोडवू शकत नाही. संघटनेचे अंतिम ध्येय राजकारण नसून समाजसेवा आणि देशात सकारात्मक बदल घडवणे हेच आहे. त्यासाठी देशातील सर्व नागरिक आणि समर्थकांना एकत्र आणून देश सुधारण्याचे काम केले जाईल, असे दीपके यांनी सांगितले.

सीजेपीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

सीजेपीने आज आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांची राष्ट्रीय संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर सह-संयोजक पदाची जबाबदारी आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अन्य जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे… राष्ट्रीय संघटन प्रभारी – अजिंक्य शिंदे, संघटन सहप्रभारी आणि उत्तर विभागीय प्रभारी – दीपक बालियान, राष्ट्रीय सचिव – आफरीन नवाज, मीडियाप्रमुख व दक्षिण विभाग प्रभारी – विजय रेड्डी मलांगी, कायदा विभागप्रमुख – रत्ना सिंग, रिसर्च आणि पॉलिसी प्रमुख – वैष्णवी गौर, तंत्रज्ञान प्रमुख – रोहन देशपांडे, वित्त प्रमुख व पश्चिम विभाग प्रभारी – योगेश इंगळे, अंकित भारद्वाज (पूर्व आणि ईशान्य विभाग प्रभारी)

कोणत्या मुद्दय़ावर लढा?

देशातील बिघडलेली शिक्षण व्यवस्था आणि आवाक्याबाहेर गेलेले शिक्षण शुल्क हा मुख्य मुद्दा असून या विरोधात सीजेपी प्रामुख्याने आवाज उठवेल.

देशात सध्या 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून उच्च शिक्षण असूनही 60 टक्के तरुणांकडे नोकऱ्या नाहीत, याबाबत आक्रमक भूमिका घेणार.

देशातील न्याय व्यवस्था अधिक मजबूत आणि पारदर्शक बनवणे, त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी सरकावर दबाव वाढवणार.

संविधानाला धरून काम

सीजेपीची विचारधारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांवर आधारित आहे. त्यांनी भारतासाठी जे स्वप्न पाहिले ते पूर्ण करण्यासाठी आम्ही संविधानाला धरून लढा देत आहोत.

नागरिकांची भीती संपवणे हेच यश

आमच्यासाठी आंदोलनाचे यश हे फक्त कुणाचा राजीनामा घेणे नाही, तर देशातील सामान्य नागरिकांच्या मनातील सरकार विरोधातील भीती पूर्णपणे संपणे हे खरे यश आहे, असे दीपके म्हणाले.

देशात शिक्षण घेणं म्हणजे डोक्यावर कर्ज ठेवणं

बेरोजगारी, देशाची आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणाची किती वाईट अवस्था आहे, यावर कोणीच काही बोलायला तयार नाही.  आज आपल्या देशात शिक्षण न परवडणारे झालं आहे. पहिली-दुसरीच्या मुलांसाठी वर्षाची फी एक-दीड लाख आहे आणि खासगी शाळांमधील डोनेशन वेगळेच. कॉलेजच्या वाढलेल्या फी आणि कोचिंग क्लासेसमुळे सामान्य पालकांवर प्रचंड बोजा पडत आहे. आजच्या काळात आपल्या देशात शिक्षण घेणं म्हणजे डोक्यावर कर्ज ठेवणं आहे, असे दीपके म्हणाले.

डिग्री नाही ते सरकार चालवतात

देशातील तरुणांना वाटत आहे की आम्ही शिकून डिग्री घेऊन काही चूक केली आहे का? कारण ज्या लोकांनी कधी डिग्री घेतली नाही ते सरकार चालवतात, निर्णय घेतात. आमचं भविष्य अशिक्षित लोक ठरवत आहेत, असा टोला अभिजित दीपके यांनी लगावला.

सर्वसामान्य जनतेचा आवाज ऐकण्याची तीव्र गरज आहे. प्रशासनाने आणि नेत्यांनी लोकांचे म्हणणे ऐकले नाही तर जनतेला थेट रस्त्यावर उतरावेच लागेल.