सरसंघचालक म्हणतात आंदोलक ‘जेन-झी’ ऑण्टिनॅशनल नाहीत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘लोकशाहीमध्ये आंदोलन हा एखाद्या मुद्दय़ावर सहमती घडवून आणण्याचा एक मार्ग आहे. त्यात चुकीचे काही नाही. आपल्याकडे जेन-झी तरुणांनी केलेले आंदोलन हे त्यांना झालेल्या त्रासाविरुद्ध होते. त्यामुळे ते अण्टिनॅशनल ठरत नाहीत,’ असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज मांडले.

मुंबईत जेन झी आणि जेन अल्फा विद्यार्थ्यांसोबत झालेल्या एका कार्यक्रमात भागवत बोलत होते. नीट पेपरफुटीविरोधात जंतरमंतरसह देशभरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भाजप समर्थकांकडून राष्ट्रविरोधी म्हणून हिणवले गेले. त्या पार्श्वभूमीवर भागवत यांनी हे मत मांडले. ‘जेन झी हे आपलेच लोक आहेत. आपली पुढची पिढी आहे. ही पिढी आमच्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक आहे असे मला वाटते. या पिढीला त्यांच्या प्रश्नांची तार्किक उत्तरे हवी असतात. ते भावनिक, अनुकरणशील आहेत. जे त्यांना खरे वाटते त्यास प्रामाणिक प्रतिसाद देतात’, असे निरीक्षण भागवत यांनी नोंदवले.

‘लोकशाहीमध्ये सहमती घडवण्यासाठी परस्पर संवाद व्हायला हवा. तो संवाद तुटला की आंदोलनाची वेळ येते. जेन-झीने आंदोलन करू नये असे म्हणणे चुकीचे आहे. जंतरमंतरवर जमलेल्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी खऱ्याखुऱ्या होत्या. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हाव्यात असे त्यांचे म्हणणे होते. त्या होत नसल्याने हे आंदोलन उभे राहिले, असे सांगत भागवत यांनी मोदी सरकारविरोधी जेन-झी आंदोलनाचे समर्थन केले. मात्र, ‘आंदोलनाची एक पद्धत असते. घटनाकारांनी त्यावर मार्गदर्शन केले आहे. आंदोलन हे एखाद्या व्यक्तीविरुद्ध नसावे, ते व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी असावे,’ असेही भागवत पुढे म्हणाले.

लाठीमार चूक की बरोबर हे सांगू शकत नाही!

विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार व पॅलेट गनच्या माऱ्याबद्दल विचारले असता भागवत यांनी थेट उत्तर देणे टाळले. ‘नेमके काय झाले, कसे झाले आणि का झाले हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. त्यावर मत मांडण्याइतपत माहिती आज माझ्याकडे नाही. त्यामुळे कोण चुकीचे कोण बरोबर हे सांगू शकणार नाही. मात्र, डोळे झाकून एखाद्यावर विश्वास ठेवायचा झाला तर मी जेन-झीवर ठेवेन’, असे भागवत यांनी सांगितले.