दीड लाखाहून अधिक गोविंदांना 75 रुपयांत 10 लाखांचे विमाकवच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहीहंडी उत्सवासाठी राज्यातील 1 लाख 60 हजार गोविंदांना यंदा 10 लाखांचे विमा कवच मोफत देण्याचा निर्णय आज राज्य शासनाने घेतला. त्यासाठी प्रत्येकी फक्त 75 रुपये प्रीमियम राज्य शासनाकडून भरला जाणार आहे. दहीहंडी खेळताना गोविंदाचा मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये या विमा योजनेनुसार मदत मिळणार आहे तसेच जखमी गोविंदांना उपचारासाठी रुग्णालयीन खर्च म्हणून कमाल 1 लाख रुपये देण्याची तरतूदही या योजनेमध्ये आहे.

क्रीडा व युवक कल्याण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी केला. गेल्या वर्षी दीडशे गोविंदांना हे कवच देण्यात आले होते. यंदा गोविंदा पथकांची वाढती संख्या विचारात घेऊन त्यात वाढ करण्यात आली. मानवी मनोरा कोसळून गोविंदाचा मृत्यू झाल्यास, दोन्ही डोळे अथवा शरीराचे दोन अवयव निकामी झाल्यास किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयांचे आर्थिक संरक्षण दिले जाईल. एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास 5 लाख रुपये आणि कायमस्वरूपी अपूर्ण अपंगत्व आल्यास विमा योजनेतील निश्चित टक्केवारीनुसार मदत मिळणार आहे. प्रतिगोविंदा 75 रुपये किंवा त्यापेक्षा कमी हप्ता आकारणाऱ्या शासकीय विमा कंपनीकडून विमा घेण्याचे निर्देश क्रीडा आयुक्तांना देण्यात आले आहेत.

या योजनेसाठी गोविंदांची नोंदणी करण्याची जबाबदारी अंधेरी येथील ‘महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन’ या संस्थेकडे देण्यात आली आहे. पात्र गोविंदांची यादी या संस्थेकडून क्रीडा आयुक्तांकडे दिली जाईल.

नियम व अटी

दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना झालेल्या अपघातांसाठीच विमा संरक्षण.

न्यायालयाने आखून दिलेल्या बाल गोविंदांच्या वयोमर्यादेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक.

आयोजकांनी पोलीस, पालिका, संबंधित आवश्यक परवानग्या घेणे व सुरक्षा उपाययोजना करणे अनिवार्य.

अनुचित प्रकार किंवा अपघात घडल्यास  पोलीस आणि गोविंदा असोसिएशनला त्वरित अहवाल द्यावा.