नीट पेपरफुटी प्रकरणातील तीन मुख्य सूत्रधार महाराष्ट्रातले, सीबीआयचे 13 जणांविरोधात आरोपपत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘नीट-यूजी’ परीक्षेचा पेपर कुठल्याही छापखान्यातून नव्हे, तर शिक्षक म्हणून ज्यांच्यावर विश्वास होता त्यांनीच फोडला. हा कट अनेक महिन्यांपूर्वीच रचला होता. पेपर तयार करण्याची जबाबदारी दिलेल्या शिक्षकांनी प्रश्न तोंडपाठ करून ठेवले होते. हॉटेलमध्ये परतल्यानंतर ते प्रश्न कागदावर लिहून काढायचे आणि ते कोचिंग क्लासेस तसेच इतर दलालांच्या माध्यमातून विकायचे. सीबीआयने नीट पेपरफुटीबाबत विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सीबीआयने पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदार या महाराष्ट्रातल्या तीन विषयतज्ञांना मुख्य सूत्रधार म्हटले असून एकूण 13 जणांवर ठपका ठेवला आहे.

सीबीआयच्या आरोपपत्रानुसार एनटीएच्या पॅनलमधील रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी, भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे आणि जीवशास्त्राच्या शिक्षिका मनीषा हवालदार हेच पेपरफुटीचे मुख्य स्रोत आहेत. त्यांना पेपर तयार करण्यासोबतच त्याचा मराठी अनुवाद तयार करण्याचे काम सोपवण्यात आले होते. त्यांनी अतिशय चलाखीने सर्व प्रश्नांचे पाठांतर करून पेपर फोडले. या तज्ञांना पेपर तयार करण्यासाठी एनटीएच्या इमारतीत एका गोपनीय ठिकाणी काही कोरे कागद देण्यात आले होते. त्याच कागदांवर भाषांतर करायचे होते. पी. व्ही. कुलकर्णी याने या कागदांवर रसायनशास्त्राचे सर्व 135 प्रश्न थोडक्यात लिहून काढले. ते छोटय़ा कागदांवर उतरवले आणि लपवून सर्व कागद बाहेर आणले. कुलकर्णीने सोप्या प्रश्नांचे पाठांतर केले. ते प्रश्न हॉटेलवर आल्यानंतर त्याने लिहून काढले. ते त्याने कोचिंग क्लासेसला पुरवले.

मनीषा मांढरे हिची पद्धत थोडी वेगळी होती. एनटीएमध्ये काम आटोपून परतल्यानंतर ती एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्राशी संबंधित महत्त्वाचे परिच्छेद अधोरेखित करायची. अनेक वर्षांचा अनुभव असल्यामुळे ती या परिच्छेदांवर आधारित प्रश्न सहज काढत असे. तर, मनीषा हवालदार ही हॉटेलवर परतल्यानंतर भौतिकशास्त्राचे प्रश्न लिहून काढत असे. त्यामुळे तिघे पेपरफुटीचे मूळ सूत्रधार आणि स्रोत होते, असे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे.

डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम सुरूच

मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. फाईल्स शेअर करण्यासाठी टेलिग्राम, व्हॉट्सअप आणि इतर मेसेजिंग अॅपचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय मांगिलाल बिवाल याच्या मोबाईल पह्नमधून काही ऑडिओ फाईल्स आढळल्या होत्या. त्यापैकी 26 एप्रिलच्या एका क्लिपमध्ये पेपरफुटी उघडकीस येण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

विद्यार्थ्याच्या आईकडून महागडे घडय़ाळ भेट

पेपरफुटीप्रकरणात सीबीआयने अनेक खुलासे केले आहेत. 2 जून रोजी नीटची परीक्षा झाल्यानंतर एका विद्यार्थ्याच्या आईने खूश होऊन पी. व्ही. कुलकर्णी याला महागडे घडय़ाळ भेट दिले. तर एका विद्यार्थ्याला मनीषा हवालदारने केवळ 25 हजार रुपयांमध्ये प्रश्न लीक केले. हे पुरावे नष्ट करण्यासाठी तिने प्रश्न आणि नोट्स लिहिलेली वही जाळून टाकली, असे सीबीआयने म्हटले आहे. याशिवाय पी. व्ही. कुलकर्णी याच्या माय गेट या अॅपमधील विद्यार्थ्यांच्या एन्ट्रीचेदेखील पुरावे जोडले आहेत. त्यावरुन विद्यार्थी कुलकर्णीच्या घरी गेल्याचे सिद्ध होते, असे सीबीआयने म्हटले आहे.

एनटीएतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न

एनटीएच्या इमारतीतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. एनटीएमध्ये या तज्ञांची कोणतीही तपासणी केली जात नव्हती. तसेच कामाच्या ठिकाणी सीसीटीव्हीद्वारे मॉनिटरिंग नव्हते. त्यामुळे तिघांनाही प्रश्नपत्रिका पह्डताना कोणतीही अडचण आली नाही.

पेपरफुटीची साखळी

तीन विषय तज्ञांनी फोडलेला पेपर तेजस शहा, डॉ. मनोज शिरुरे, शिवराज मोटेगावकर, धनंजय लोखंडे आदींच्या माध्यमातून विविध कोचिंग क्लासेसपर्यंत पोहोचला. तेथे विद्यार्थ्यांकडून सराव करून घेण्यात आला. तर शुभम खैरनार, मांगीलाल बिवाल, दिनेश बिवाल, विकास बिवाल यांनी राजस्थानमध्ये तर यश यादव याने हरयाणामध्ये पेपर विकला. तेजस शहा आणि मनीषा हवालदार यांच्या फोनमध्ये आढळलेल्या पेपरमधील हस्ताक्षर आरोपींच्या हस्ताक्षरांसोबत तंतोतंत जुळत असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.