गृहमंत्री मुंबईपासून कश्मीरपर्यंत फिरताहेत; संसदेमध्येही बसतात, पण सभागृहात येत नाहीत, संजय राऊत यांचा अमित शहांवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. पहिले दोन आठवडे दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज आणि पेलेट गन्सचा वापर, अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन निवेदन द्यावे अशी मागणी विरोधक करत आहेत. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनीही हाच मुद्दा धरत अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, संसदीय कामकाजाचा हा शेवटचा आठवडा आहे. आतापर्यंत कामकाज चालले नाही, असे म्हणता येणार नाही. पेपरफुटीवर चर्चा झाली आणि परीक्षा सुधारणा विधेयकही आले. त्याच्यावर आम्ही चर्चा केली. पण आमची मुख्य मागणी हीच आहे की जंतरमंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर ज्या निर्घृण पद्धतीने पेलेट गनचा मारा करण्यात आला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि खिळे लावलेल्या लाठ्यांनी लाठीमार केला. या निर्घृण कृत्याची गृहमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी आणि त्याबाबत निवेदन करावे.

पण पंतप्रधान मोदी सभागृहात यायला तयार नाहीत आणि देशाचे गृहमंत्री अमित शहाही यायला तयार नाहीत. गृहमंत्री मुंबईपासून काश्मीरपर्यंत फिरताहेत, संसदेमध्ये बसतात आणि सभागृहात येत नाहीत. मोदीही येत नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या चेंबरमध्ये विरोधकांची बैठक होईल आणि त्यानंतर पुढची रणनीती ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पेलेट गन्स, लाठीचार्ज अन् 20 दिवसांचे मौन; अकार्यक्षम गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, राहुल गांधींची मागणी

…तोपर्यंत गोंधळ सुरूच राहणार

संसदेत गोंधळ कायम असल्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, जोपर्यंत अमित शहा संसदेत येऊन जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जची जबाबदारी कुणाची, आदेश कुणी दिला याबाबत निवेदन देत नाहीत तोपर्यंत संसदेत कोणतेही बील शांततेत मंजूर होणार नाही. गोंधळ सुरूच राहणार.

शेख हसीनांचे संरक्षण करता, पण…

दरम्यान, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्यावरही संजय राऊत यांनी परखड शब्दात प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर हल्ला चढवला. ममता बॅनर्जी या फक्त पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री नाही. त्या अशा महिला नेत्या आहेत ज्यांनी जवळपास 15 वर्षे पश्चिम बंगालचे नेतृत्व केले. निवडणूक हरल्या म्हणजे सर्वकाही हरले असे नाही. तुम्ही बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरक्षण करू शकता, त्यांच्यासाठी सुरक्षेचा तामझाम करता, पण देशातील एका राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचे संरक्षण करू शकत नाहीत. हे टीएमसी आणि जनतेचे भांडण आहे म्हणता. मग कायदा-सुव्यवस्थेचा अर्थ काय? हे भाजपचे गुंड असल्याचे पुरावेही समोर आले आहेत. सत्ता येते आणि जाते. हा जर टीएमसी आणि जनतेचा वाद असेल, तर जंतरमंतरचा वादही संपूर्ण देशाचा आणि मोदींचा आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

मला जेलमध्ये टाकले वा मारले तरीही मी परतणार – शेख हसीना