मोठ्यांना मोकळा महामार्ग अन् छोट्यांना काटेरी सापळा, स्काॅटलंड-नेदरलँड्सचा आयसीसीवर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेटला जागतिक बनवण्याचे ढोल बडवणाऱ्या आयसीसीचा खरा चेहरा आता उघड पडल्याची भावना सहयोगी संघांमध्ये तीव्र झाली आहे. आयसीसीने 2027च्या एकदिवसीय वर्ल्ड कपसाठी जाहीर केलेला हा फॉरमॅट मोठय़ा संघांना मोकळा महामार्ग आहे तर छोट्या सहयोगी संघांसाठी काटेरी सापळा असल्याची जोरदार टीका करत स्काॅटलंड आणि नेदरलँड्स या संघटना संतापल्या आहेत. त्यांनी आयसीसीवर जोरदार हल्ला चढवत अपारदर्शक, एकतर्फी आणि अन्यायकारक कारभाराचा थेट आरोप केला आहे.

मूळ 14 संघांचा वर्ल्ड कप अचानक 12 संघांवर आणण्यात आला आणि तळाच्या संघांना ‘सुपर सीरीज’ नावाच्या अतिरिक्त अडथळ्यात ढकलण्यात आले. म्हणजे मुख्य स्पर्धेत पोहोचण्यासाठी छोटय़ा संघांना तीन-तीन पात्रता टप्प्यांची खडतर शर्यत पार करावी लागणार आहे. मर्यादित निधी, कमी संसाधने आणि कमी सामन्यांमध्ये झगडणाऱया सहयोगी बोर्डांसाठी हा निर्णय क्रिकेट विकासावर घाव मानला जात आहे.

स्काॅटलंड आणि रॉयल डच संघटनांच्या संयुक्त निवेदनात आयसीसीच्या गव्हर्नन्स, पारदर्शकता आणि सदस्यांशी संवादावर जोरदार प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. दोन बैठका घेऊनही लेखी स्पष्टीकरण न देणे हे निराशाजनक आणि अनादरपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे. एडिनबर्गमधील वार्षिक परिषदेत हा निर्णय मंजूर झाला असला, तरी अनेक सहयोगी सदस्यांना निर्णय प्रक्रियेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याचा गंभीर दावा समोर आला आहे.

क्रिकेटचा विस्तार करण्याऐवजी मोठय़ा देशांना सुरक्षित प्रवेशद्वार आणि छोटय़ा संघांना अडथळ्यांची भूलभुलैया देण्याचा आयसीसीचा हा डाव असल्याची टीका आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जोर धरत आहे.