उत्तर प्रदेशात पूरस्थिती गंभीर; 173 गावे पाण्याखाली, 84 हजारांहून अधिक नागरिक प्रभावित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील पूरस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, राज्यातील 13 जिल्ह्यांतील 173 गावांना पुराचा फटका बसला आहे. या पूरस्थितीमुळे तब्बल 84 हजार नागरिक प्रभावित झाले असून, सुमारे 13 हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. दरम्यान, हवामान विभागाने 19 ते 23 ऑगस्टदरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.

राज्यातील पूरस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असले, तरी पूरग्रस्त भागांमध्ये प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू असून, अन्न, औषधे आणि इतर अत्यावश्यक साहित्याचा पुरवठा केला जात आहे. मदत आणि बचाव पथकेही संवेदनशील भागांमध्ये तैनात करण्यात आली आहेत.

आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार, राज्याचे मदत आयुक्त हृषिकेश भास्कर यशोद यांच्या कार्यालयाच्या माहितीनुसार, बदाऊन, बहराइच, बलिया, बाराबंकी, बिजनौर, फर्रुखाबाद, गौतम बुद्ध नगर, गोंडा, कासगंज, लखीमपूर खेरी, मुझफ्फरनगर, सीतापूर आणि उन्नाव या जिल्ह्यांतील काही भाग पूरग्रस्त झाले आहेत. गंगा, यमुना, शरयू आणि राप्ती या प्रमुख नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे.

हवामान विभागाने 19 ऑगस्टला पूर्व आणि दक्षिण उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. बांदा, चित्रकूट, कौशांबी, प्रयागराज, सोनभद्र, मिर्झापूर, चंदौली, संत रविदास नगर आणि महोबा येथे अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय फतेहपूर, प्रतापगड, वाराणसी, जौनपूर, हमीरपूर आणि ललितपूर येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कानपूर नगर, उन्नाव, रायबरेली, अमेठी, सुलतानपूर आणि झाशी परिसरातही पावसामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. हा पावसाचा जोर 23 ऑगस्टपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे.

वाराणसीमध्ये गंगा नदीच्या पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. अवघ्या 10 तासांत नदीची पातळी सुमारे 42 सेंटीमीटरने वाढून 67.14 मीटरवर पोहोचली. गंगेची धोक्याची पातळी 70.212 मीटर आहे. गंगेचे पाणी घाटांवर आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये शिरले असून, अनेक घाटांमधील संपर्क तुटला आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बोटींची वाहतूक बंद करण्यात आली आहे. मणिकर्णिका घाट पाण्याखाली गेल्याने घाटालगतच्या इमारतींच्या छतांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. हरिश्चंद्र घाटावरही अशीच परिस्थिती आहे. दशाश्वमेध आणि शीतला घाटांवरील गंगा आरतीचे ठिकाण बदलण्यात आले असून, आता घाटालगतच्या इमारतींच्या छतांवर आरती केली जात आहे.