
>> वैश्विक
लघुग्रहांचा शोध घेणाऱ्या अवकाशी मोहिमा अनेक कारणांसाठी आवश्यक असतात. एकतर असे लघुग्रह आपल्या ग्रहमालेत दुरून कुठून म्हणजे सौरमालेपलीकडून आले असतील तर आपल्या आकाशगंगा दीर्घिकेतील आपल्या सौरसंकुलापलीकडचा ‘भू’भाग कसा असू शकतो याची माहिती मिळू शकते. समजा त्यावर अतिसूक्ष्म सजीव किंवा त्याचा जीवाश्म सापडला तरी अन्यत्र कुठे कोणी आहे का याचा तर्क करून मग त्या दिशेने संशोधन होऊ शकते.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा एखादा लघुग्रह किंवा अशनी पृथ्वीच्या जवळ येण्याच्या बेतात असेल किंवा संभाव्य धडक देणार असेल तर ‘डार्ट’च्या प्रयोगाने केला तसा त्याचा मार्ग (म्हणचे कक्षा) बदलता येऊ शकते. कारण अंतराळात असे लाखो अशनी, लघुग्रह इतस्ततः फिरत असून त्यापैकी काहींचा धोका पृथ्वीसाठी कायमच असतो. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी एका महाअशनीच्या धडकेमुळेच पृथ्वीवरचे सारे
डायनॉसॉर नष्ट झाले.
तेव्हा विविध प्रकारच्या अभ्यासासाठी लघुग्रह आणि अशनीचे जवळून निरीक्षण करणे गरजेचे ठरते. मागच्या लेखात उल्लेख केलेली जपानची ‘हायाबुसा-2’ ही मोहीम फार महत्त्वाची ठरते. ‘हायबुसा-1’ या यानाने ‘इटोकावा’ या लघुग्रहाची केवळ माहिती मिळवली. ‘हायाबुसा-2’ आता ‘रायुग्यु’ नावाच्या लघुग्रहावरची मातीही आणणार आहे!
सुरुवातीला हा ‘रायुग्यु’ कोण ते जाणून घेऊ. ‘162175-रायुग्यु’ हा एक पृथ्वीनिकट लघुग्रह आहे. त्याचा शोध 10 मे 1999 रोजी ‘लिंकन निअर अर्थ अॅस्टेरॉईड रिसर्च’ या न्यू मेक्सिकोतील संस्थेने लावला. 28 सप्टेंबर 2015 रोजी त्याचे ‘रायुग्यु’ असे नामकरण झाले. त्याचा अर्थ ‘डॅगन पॅलेस.’ जपानी लोककथेत या नावाचा सागरतळाशी असलेल्या राजवाडय़ाचा उल्लेख येतो.
‘रायुग्यु’चा जन्म एका लघुग्रह ‘परिवारा’चा भाग म्हणून झाला. युलैलिया किंवा पॉलाना हे त्याचं कटुंब. जन्म वेळेला अत्यंत उष्णता सहन केलेला. हा लघुग्रह कोरडाठाक असून त्याला मॅग्नॅटिक फिल्ड (चुंबकीय क्षेत्र) नाही. हा लघुग्रह सूर्याभोवती 0.96 ते 1.41 खगोलीय एकक अंतरावरून लंबवर्तुळाकार फिरतो. तो पृथ्वीपासून जवळ असतो. त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर 95,443 किलोमीटर असते. म्हणजेच चंद्राच्या अंतराच्या तुलनेत 0.23 इतके. मध्ये फुगीर आणि दोन्ही बाजूंनी निमुळता असा ‘गोलगप्प्या’सारखा ‘रायुग्यु’चा आकार (पुरीसारखा) गोल आहे. 1004 x 876 घनमीटर असा त्याचा आकार असून तो सूर्याभोवती पृथ्वीच्या तुलनेत 1.30 वर्षांत फेरी मारतो.
आता ‘हायाबुसा-2’ ही मोहीम या ‘रायुग्यु’चा वेध कशासाठी घेतेय? एखाद्या ‘निअर-अर्थ’ किंवा पृथ्वीनिकट लघुग्रहाची तपासणी करणे. सुमारे 900 मीटर व्यासाच्या ‘रायुग्यु’च्या दिशेने ‘हायाबुसा-2’ हे यान 3 डिसेंबर 2014 रोजी निघाले. 2018 च्या जूनमध्ये त्याचा ‘रायुग्यु’शी संपर्क झाला. ‘हायाबुसा-2’ यानाने त्यावर 2 किलो वजनाच्या एका उपकरणाला इम्पॅक्टरद्वारे ‘रायुग्यु’ किंवा ‘ऱ्यग्यु’वर 14.5 मीटरचा खड्डा पडला. त्या वेळी त्यातून उडालेली प्रचंड धूळ ‘हायाबुसा-2’ने लगेच पकडली. ‘हायाबुसा-2’ पुन्हा जेव्हा पृथ्वीची परिक्रमा करण्यासाठी जवळ आले तेव्हा त्याने एका कुपीमधून ‘रायुग्यु’वरची गोळा केलेली दगड-माती पृथ्वीवर टाकली.
वैज्ञानिकांनी या पॅरॅशूटद्वारे ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटात पडलेल्या कुपीचा शोध घेऊन त्यातील दगड-मातीचे पृथःकरण केले. त्यांच्या रासायनिक चाचण्यांमधून असे लक्षात आले की, ‘रायुग्यु’ नावाच्या एका लघुग्रह किंवा अशनीवर सूक्ष्मजीवांची वाढ झालेली दिसली. विशेष म्हणजे ‘रायुग्यु’वरच्या मातीमध्ये ‘डीएनए’ आणि ‘आरएनए’ असलेले ‘न्यूक्लिओराइड्’सुद्धा मिळाले!
‘हायाबुसा-2’ अजूनही अंतराळात फिरत आहे. त्याचे इंधन शिल्लक असल्याने वैज्ञानिकांनी त्याला पुढचे काम दिले. ते ‘टोरिफुने’ आणि ‘1998 केवाय-26’ या पृथ्वीनिकटच्या आणखी दोन लघुग्रहांनाही उडती भेट द्यायची. त्यापैकी ‘टोरिफुने’जवळून 17 हजार किलोमीटर वेगाने हे यान गेले. त्या वेळी या लघुग्रहापासून ते अवघ्या 800 मीटरवर होते. त्यामुळे ‘टोरिफुने’चे कितीतरी फोचो ‘हायाबुसा-2’ला घेता आले. हा ‘टोरिफु’ने सुमारे 450 मीटर व्यासाचा अशनी आहे. तो ‘कॉन्टॅक्ट बायनरी (स्पर्श-जोड) असल्याचे त्याच्या फोटोमधून दिसते.
‘1998 केवाय-26’ हा लघुग्रह 11 मीटर व्यासाचा असून ‘हायाबुसा-2’ त्याचाही शोध घेईल. तिथे पोहोचायला त्याला आणखी 5 वर्षे लागतील. 2031 च्या जुलैमध्ये तिथेही भेट देऊन ‘हायाबुसा-2’ आपली मोहीम फत्ते करील. लघुग्रहांचा ‘परिचय’ करून घेणाऱया आणि जगापुढे मांडणाऱ्या या मोहिमा छोटय़ा वाटल्या तरी विलक्षण आहेत.































































