मुंबईतील मैदाने आणि भूखंड वाचवण्यासाठी रविवारी शिवसेनेचे वांद्र्यात तिरंगा आंदोलन; अंधेरीचे क्रीडा संकुल ग्राऊंड आणि जुहूतील दोन जागा भाजप आमदारांच्या घशात घालण्याचा डाव – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील मोकळे भूखंड लाटण्याचे सत्रच भाजपने सुरू केले आहे. अंधेरी पश्चिम येथील छत्रपती शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलचे मैदान आणि जुहूतील दोन भूखंड भाजप आमदारांच्या घशात घालण्याचा महायुती सरकारचा डाव आहे, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. मोकळी मैदाने वाचवण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार असून येत्या रविवारी वांद्र्यात तिरंगा आंदोलन केले जाईल, अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली.

छत्रपती शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलाच्या ज्या भूखंडावर भाजपचा डोळा आहे त्याची आदित्य ठाकरे यांनी आज पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना आमदार हारून खान, नगरसेविका सबा हारून खान, शिवसेनेच्या शिव संचार सेनेचे अध्यक्ष व शिवसेना प्रवत्ते अखिल चित्रे आदी उपस्थित होते. त्यानंतर मैदानावरच आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या षड्यंत्राचा पर्दाफाश केला. सर्वसामान्य नागरिकांना क्रिकेट, वॉकिंग ट्रक, सायकल ट्रक, अर्बन फॉरेस्टसारख्या सोयी या मैदानात शिवसेनेने महापालिकेच्या माध्यमातून तयार केल्या होत्या. त्यावेळी या मैदानाचे मूल्य साडेपाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. आता त्याची किंमत किती असेल याचा विचार करा. हेच मैदान आता मुख्यमंत्री वार्षिक अवघ्या 21 लाख रुपयांमध्ये भाजप आमदाराच्या घशात घालत आहेत असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. जुहूमधील दोन भूखंडही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या मित्राला मोफत देत आहेत असेही त्यांनी सांगितले.

वांद्रय़ाचा फुटबॉल क्लब ढापला

वांद्रय़ाचा नेव्हील डिसोझा फुटबॉल क्लबदेखील ढापून एका ट्रस्टला दिला जाणार आहे. तिथे एक्झिबिशन सेंटर आणि कन्व्हेन्शन सेंटर  करणार आहेत आणि नेव्हील डिसोझा नाव पुसून तिथे भाजपच्या नेत्याचे नाव देणार आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी नेव्हल डिसोझा यांच्या योगदानाचा प्रामुख्याने उल्लेख केला. गोव्यात जन्म झालेले नेव्हील डिसोझा नंतर मुंबईत राहायला आले होते. हिंदुस्थानसाठी ऑलिम्पिकमध्ये हॅटट्रीक मारणारे ते फुटबॉलर होते, असे ते पुढे म्हणाले.

पंतप्रधानांचे या भ्रष्टाचाराकडे लक्ष आहे का?

पुढच्या पंधरा दिवसात भाजप आमदारांना सर्व भूखंडाचे श्रीखंड खाण्यास मोकळीक द्यावी, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी महानगरपालिकेला दिले असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे, असे सांगतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या भ्रष्टाचाराकडे लक्ष आहे का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

प्रभादेवीचे मैदान, मुलुंड स्पोर्टस् कॉम्प्लेक्सच्या जागेवरही डोळा

प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिराच्या मागे असलेले मैदानही मेट्रोच्या माध्यमातून बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा प्रकारे मुंबईतील अनेक मोकळी मैदाने घेतली जात आहेत. बेस्टच्या 22 डेपोंच्या खासगीकरणाचा प्रस्ताव सरकारने घाईगडबडीत मंजूर करून घेतला. मुलुंडमधील स्पोर्टस् कॉम्प्लेक्ससाठी आरक्षित जागा पेट्रोल पंपाला दिली जात आहे, असा भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराचा लेखाजोखाच आदित्य ठाकरे यांनी मांडला.

भाजपला प्रश्न विचारणाऱया ‘जेन झी’ आणि मुंबईकरांवर सूड उगवला जातोय. भाजपच्या लाडक्या बिल्डर्स आणि कंत्राटदारांच्या फायद्यासाठी मुंबईतील हजारो कोटी रुपयांच्या जमिनी, मुख्य म्हणजे मोकळ्या जागा भाजपच्या मित्रांना कवडीमोल भावाने दिल्या जात आहेत. याचसाठी भाजपला मुंबई महापालिका घ्यायची होती. या जमीन लाटण्याच्या घोटाळ्याविरोधात शिवसेना लढा देईल.

नेव्हील डिसोझा फुटबॉल क्लबपासून आंदोलनाला सुरुवात

मोकळी मैदाने वाचवण्यासाठी रविवारी वांद्रे येथील रंगशारदासमोरील नेव्हील डिसोझा फुटबॉल मैदान येथे सायंकाळी 5 वाजता तिरंगा आंदोलन होईल. या आंदोलनात मनसे नेते अमित ठाकरे आणि काँग्रेस नेतेही सहभागी होणार आहेत. सर्व मुंबईकर, क्रीडाप्रेमी, क्रीडा संस्था, स्वयंसेवी संस्था, तरुणाईने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.