
सणासुदीचा काळ सुरू होण्यापूर्वीच संपूर्ण देशात महागाईमुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले आहे. गेल्या १५ दिवसांत साखर १७ रुपयांनी महाग झाली असून किरकोळ बाजारात साखरेचे भाव पहिल्यांदाच ६५ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्याने देशभरात गहू आणि कांद्याच्या किमतीने मोठी उसळी घेतली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी साखर ४८ ते ५० रुपये प्रति किलो मिळत होती. परंतु ती आता ६५ रुपये किलोवर पोहोचली आहे. घाऊक बाजारातही साखरेने पहिल्यांदाच ६० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. साखर कारखान्यांनी नफा वाढवण्यासाठी उसापासून साखर तयार करण्याऐवजी इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे साखरेच्या उत्पादनात ५ टक्के घट झाली आहे.
सणासुदीच्या काळात साखरेचा कृत्रिम तुटवडा आणि भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. दरमहा १० मेट्रिक टनपेक्षा जास्त साखरेचा वापर करणाऱ्या मोठ्या डीलर्स, बिस्किट आणि कन्फेक्शनरी कंपन्यांवर मर्यादा घालण्यात आली आहे. हे व्यापारी आता १५ दिवसांपेक्षा जास्त साखरेचा साठा करू शकणार नाहीत. हा नवा नियम १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ कालावधीत देशभरात लागू होईल.
कांद्याने रडवले
साखर, गहू, खाद्यतेलाच्या किमतीत आधीच वाढ झालेली असताना आता कांद्याचा भावही प्रति किलो ५० रुपयांच्या पुढे गेला आहे. खरीप हंगामातील नव्या कांद्याची आवक उशिरा सुरू झाल्याने कांद्याचा सरासरी किरकोळ दर ५० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. एक महिन्याआधी हाच कांदा ३० रुपये किलोने मिळत होता.


























































