
शिलाँगमध्ये बाईक रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर आसाम आणि मेघालय सीमेवरील तणाव वाढला आहे. या घटनेच्या निषेधार्थ गुवाहाटीतील टॅक्सी चालकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 27 वर नाकाबंदी केल्याने दोन्ही राज्यांदरम्यानची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. आसाममधील जोराबत परिसरात पर्यटक वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांनी मेघालय नोंदणी क्रमांक असलेल्या वाहनांना अडवले. या नाकाबंदीमधून केवळ रुग्णांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना गुवाहाटीच्या दिशेने जाण्याची परवानगी देण्यात आली.
एबीपी न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार आसाममधील नाकाबंदीला प्रत्युत्तर म्हणून मेघालयातील वाहतूक संघटनांनीही आसाम नोंदणी क्रमांक असलेल्या वाहनांना रोखण्यास सुरुवात केली. AKMTTA या वाहतूक संघटनेने उमियाम (बारपाणी) परिसरात आसाममधून येणाऱ्या वाहनांची वाहतूक थांबवली. तसेच FKJGP या संघटनेने बुरनिहाट येथे नाकाबंदी करून आसाममधून मेघालयात प्रवेश करणाऱ्या वाहनांना अडवले.
शिलाँगमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ सुरू झालेला हा प्रकार आता दोन्ही राज्यांतील वाहनचालक आणि विविध संघटनांमधील संघर्षात बदलला आहे. शिलाँगमधील खासी विद्यार्थी संघटना आपल्या विविध मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन करत आहे. मेघालय रहिवासी सुरक्षा कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी, राज्य लोकसेवा आयोग आणि जिल्हा निवड समित्यांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करावी, बाहेरील स्थलांतरित कामगारांसाठी कठोर नियम लागू करावेत, रुग्णालयातील परिचारिकांच्या भरती प्रक्रियेत बदल करावेत आणि पूर्व जैंतिया टेकड्यांमधील लाम सिरमन येथे श्री सिमेंटच्या प्रस्तावित खाणीसंदर्भातील सार्वजनिक सुनावणी रद्द करावी, अशा संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत.
या मागण्यांवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिलाँगमध्ये हिंसाचाराची घटना घडली आणि त्यानंतर आसाम-मेघालय सीमेवरील परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे. दोन्ही राज्यांतील नाकाबंदीमुळे प्रवाशांचे हाल होत असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.



























































