
अमेरिकेतील मेरियट हॉटेलमध्ये शेफ व्हिसा संपल्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन परतलेल्या तरुणाची हैदराबाद येथील चौघांनी इंग्लंडमधील पंचतारांकित हटिलमध्ये भरघोस पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १७ लाख ४९ हजार ९०० रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार बनावट नियुक्तीपत्र देण्यावरून लक्षात आल्यानंतर पैसे परत मागण्यासाठी हैदराबादला गेलेल्या तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या हिमेश हुसेन मोहम्मद (रा. हबीबनगर, नामपल्ली, हैदराबाद, तेलंगना), अविनाश गुंडपल्ली, इनोश कोलापुडी (रा. ट्रायडन्ट हॉटेल, हायटेक सिटी, हैदराबाद) आणि अब्दुल मोहम्मद रऊफ (रा. पीव्ही नरसिम्हा उड्डाणपूल, पिल्हर) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंगुरीबाग परिसरात राहणाऱ्या नकुल विजय सांगळे (२५, मूळगाव साताळा, पोस्ट चौका, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) याने पुण्यातील आयएचएममधून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०२२ मध्ये नकुल याने अमेरिकेतील मेरियट हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम केले होते. डिसेंबर २०२३ मध्ये किसा संपल्यानंतर हिंदुस्थानात परतल्यानंतर तो नोकरीच्या शोधात होता. त्यावेळी त्याची ओळख देवेंद्र भोसले यांच्या माध्यमातून हैदराबादमधील स्टडी अफेज इंटरनॅशनल कन्सल्टन्सीशी संबंधित हिमेश हुसेन मोहम्मद याच्याशी झाली. त्याने २० सप्टेंबर २०२४ रोजी विदेशात नोकरी लावलेल्या व्यक्तींची ऑफर लेटर, व्हिसा व अन्य कागदपत्रे नकुलला व्हॉट्सअॅपवर पाठविली. त्यानंतर इंग्लंडमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये चांगल्या पगाराची नोकरी व १०० टक्के नोकरीची हमी दिली. व्हिसा, स्पॉन्सरशिप, ऑफर लेटर, बिमान तिकीट व राहण्याच्या व्यवस्थेसाठी १८ लाख रुपये लागतील, असे सांगितले.
दरम्यान, नकुल याला हिमेश याने १५ दिवसांत इंग्लंडच्या हॉटेलचे काम होईल, असे सांगून त्याच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केली. त्याच्यावर विश्वास ठेवून नकुल याने २९ सप्टेंबर रोजी देवेंद्र भोसले यांच्या खात्यावरून आरटीजीएसद्वारे पाच लाख रुपये पाठविले. त्यानंतर तीन महिन्यांनी ‘काम अंतिम टप्प्यात आहे. ५ लाख ५० हजार रुपये पाठवा’ असे हिमेश याने नकुल यास सांगितले. त्यामुळे नकुल याने पुन्हा भोसले यांच्या खात्यावरून ५ लाख ४९ हजार ९०० रुपये आरटीजीएसद्वारे पाठवले. त्यानंतर पुढील प्रक्रिया अविनाश गुंडपल्ली पाहणार असल्याचे सांगण्यात आले. ३ जानेवारी २०२५ रोजी इंग्लंडमधील ड्रॅगन पॅलेस हॉटेलच्या असिस्टंट मॅनवर पदाचे नियुक्तीपत्र नकुलला ई-मेलवर पाठविले. त्यानंतर ४ जानेवारी रोजी त्याने आणखी तीन लाख रुपये पाठविले, वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये पाठवून सीओएस लेटर मिळणार असल्याचे सांगण्यात आले. यानंतर २५ एप्रिल रोजी अंतिम व्हिसा इंटरव्ह्यूसाठी हैदराबादला बोलावण्यात आले. तेथे हिमेश, अविनाश, इनोश आणि अब्दुल उपस्थित होते.
आणखी ४ लाख ५० हजार रुपये दिल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. त्यानुसार नकुलने नातेवाईकाच्या क्रेडिट कार्डवरून चार लाख रुपये हिमेशला पाठविले. अशाप्रकारे आरोपींनी नकुल याच्याकडून टप्प्या टप्प्याने १७ लाख ४९ हजार ९०० रुपये घेतले.
नकुल याने महिनाभर बाट पाहिल्यानंतर युकेव्हीआयचे ऑफर लेटर न मिळाल्याने पैसे परत मागितले. त्यानंतर हैदराबादमधील एवीसी कॉम्प्लेक्स येथे त्याला बोलावण्यात आले, पैसे मागितल्यावर ‘पुन्हा हैदराबादला आलास तर जिवंत परत जाणार नाहीस’, अशी धमकी देण्यात आली, तसेच अब्दुल मोहम्मद रऊफ याने मारहाण केली. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बुधा शिदि करीत आहेत.




























































