शीव रेल्वे स्थानकात डॉक्टरचा टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शीव रेल्वे स्थानक परिसरातील टॉवरवर चढून डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. नोकरीवरून काढून टाकल्याच्या नैराश्येतून तो टॉवरवर चढला होता व तेथे गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शिताफीने बचाव मोहीम राबवून त्या डॉक्टरला खाली उतरवले. या घटनेने स्थानक परिसरात खळबळ उडाली.

पोलिसांनी हायव्होल्टेज टॉवरवर चढलेल्या डॉक्टरची समजूत काढून त्याला खाली उतरवण्याचे प्रयत्न केले. मात्र त्या डॉक्टरने टॉवरवरच गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. याचदरम्यान टॉवरखाली तैनात असलेले पोलीस व अग्निशमन दलाचे जवान शिताफीने टॉवरवर चढले आणि डॉक्टरला खाली उतरवले. दरम्यानच्या काळात त्याचा श्वास थांबल्यासारखा झाला होता. त्यावर त्याला ‘सीपीआर’ देण्यात आला आणि त्याचा प्राण वाचला. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित व्यक्ती मूळचा सातारा-फलटण येथील रहिवाशी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याची वस्तुस्थिती तपासण्यासाठी पोलीस अधिक तपास करीत आहेत.