वडिलांची मानसिक चाचणी करा म्हणणाऱ्या मुलाला 5 लाखांचा दंड, हायकोर्टाने बजावले; कायद्याचा गैरवापर करू नका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 वडिलांची मानसिक चाचणी करा म्हणणाऱ्या मुलाला उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. या मुलाला न्यायालयाने पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. कायद्याचा गैरवापर करू नका, असेही न्यायालयाने या मुलाला ठणकावले आहे.

या मुलाची मागणी एकल पीठाने फेटाळली.  त्यानंतर खंडपीठासमोर या मुलाने दाद मागितली. न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाथा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. हा कायद्याचा स्पष्टपणे गैरवापर आहे. वडिलांना नाहक त्रास देण्यासाठी केलेली अशा प्रकारची कृत्ये आम्ही खपवून घेणार नाही. मुलाच्या या अशा वागणुकीमुळे वडिलांना विनाकारण यातना झाल्या आहेत. याची भरपाई म्हणून मुलाने वडिलांना पाच लाख रुपये द्यावेत. या दंडामुळे तरी मुलगा भविष्यात असे वर्तन करणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोदवले.

वडिलांना केवळ मधुमेह व अन्य सामान्य आजार आहेत. यासाठी त्यांची मानसिक चाचणी करण्याची गरज नाही, असे एकलपीठाने स्पष्ट केले आहे. त्यात काहीच दोष नाही. तसेच एकल पीठाला ही मागणी अमान्य करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. तेव्हा या निकालात हस्तक्षेप करता येणार नाही, असेही खंडपीठाने नमूद केले.

मालमत्तेत हक्क मिळवण्यासाठी धडपड

या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत हक्क हवा होता. त्यासाठी त्याने वडिलांना मानसिक रुग्ण ठरवून त्यांची चाचणी करण्याचा घाट घातला. जेणेकरून वडील त्याला मालमत्तेतला हिस्सा देतील. मुलाचे हे वर्तन अत्यंत चुकीचे आहे, असे खडे बोल न्यायालयाने सुनावले.